

Kolhapur News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची चर्चा काहीशी थंडावली होती. मात्र, आता पुन्हा एकदा या चर्चांनी जोर धरला असून दोन्ही पक्षांतील नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. या संभाव्य विलीनीकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी या विषयावर भाष्य केले आहे. त्यांच्या वक्तव्यांमुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी दोघांनाही थेट इशारा दिला आहे.
संजय राऊतांचा राष्ट्रवादीच्या आमदारांबाबत मोठा दावा
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधील २० ते २२ आमदार कधीही पक्ष सोडू शकतात, असे राऊत म्हणाले होते. हे आमदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत जाऊ शकतात किंवा अन्य पक्षात प्रवेश करू शकतात, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
संजय शिरसाटांचे विलीनीकरणाबाबत भाकीत
दुसरीकडे, शिंदे गटाचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनीही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या संभाव्य विलीनीकरणावर भाष्य केले होते. दोन्ही पक्षांमध्ये सध्या अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे सांगत त्यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सकाळी विलीनीकरणाच्या चर्चा करायच्या आणि दुपारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायचे, असा प्रकार सुरू असेल तर अशा विलीनीकरणाला काही अर्थ उरत नाही, अशी टीका शिरसाट यांनी केली होती. दोन्ही पक्षांतील नेत्यांची अशीच वक्तव्ये सुरू राहिली, तर एकत्र येण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तिसरा गट निर्माण होईल, असे खळबळजनक भाकीतही त्यांनी केले होते.
'राष्ट्रवादीत नाक खुपसू नका'; हसन मुश्रीफांचा राऊतांना टोला
संजय राऊत आणि संजय शिरसाट यांच्या वक्तव्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार एकसंघ आहेत. कोणीही पक्ष सोडून कुठेही जाणार नाही. आमदारांचा दुसरा गट निर्माण होण्याची शक्यताच नाही, असा ठाम विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना मुश्रीफ म्हणाले की, राऊत हे महान नेते असून राज्याचे मुक्त विद्यापीठ आहेत. त्यांनी काय बोलावे आणि काय बोलू नये, यावर कोणाचेही बंधन राहिलेले नाही. मात्र, आमच्या पक्षाची त्यांना एवढी काळजी का वाटते, हेच समजत नाही. त्यांनी आपल्या शिवसेनेतील खासदार आणि आमदार किती आले आणि किती गेले, यावर बोलावे. विनाकारण राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल वक्तव्य करण्याची किंवा आमच्या पक्षात नाक खुपसण्याची आवश्यकता नाही, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
संजय शिरसाटांवरही मुश्रीफ संतापले; शिंदेंना केली मोठी विनंती
दरम्यान, मित्रपक्ष असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरही मुश्रीफ यांनी नाराजी व्यक्त केली. शिरसाट यांच्यासह रायगडमधील काही नेते महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे काम करत आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्षाच्या नेत्यांबद्दल अत्यंत चुकीच्या भाषेत टीका करत आहेत. बिनबुडाचे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले जात आहेत. अशा प्रकारची वक्तव्ये योग्य नसल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांची समन्वय समिती असून या समितीमध्ये सातत्याने चर्चा होत असते. महायुतीतील एका घटक पक्षाने दुसऱ्या पक्षावर जाहीरपणे टीका करू नये, अशी भूमिका यापूर्वीच ठरवण्यात आली आहे. काही तक्रारी किंवा मतभेद असतील तर ते वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घालावेत, असेही निश्चित करण्यात आले आहे.
मात्र, काही नेते वारंवार जाहीरपणे अशी वक्तव्ये करून महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित नेत्यांना अत्यंत कडक शब्दांत सूचना द्याव्यात, अशी विनंती आपण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत, याची सर्व नेत्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही हसन मुश्रीफ यांनी केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेवरून आता महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.