Kolhapur NCP Politics :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur NCP Politics : कागलचा श्रावणबाळ बलवान ठरणार का? ठरला तर पक्ष वाढणार का?

अनुराधा धावडे

Kolhapur News : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कोल्हापुरातील सभेत कार्यकर्त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आगपाखड केली. याला मुश्रीफ तपोवन च्या मैदानातून उत्तर देण्याची शक्यता आहे. शरद पवार यांची सभा दसरा चौक पेक्षा गांधी मैदानात किंवा तपोवन मैदानात व्हावी, असे म्हणणारे मुश्रीफ, शरद पवार यांच्या विरोधात तपोवन मैदानात सभा घेणार आहेत. 50 हजार पेक्षा जास्त क्षमतेचा असलेले हे तपोवन मैदान कार्यकर्त्यांनी खचकचून भरणार का? आणि भरले तर मुश्रीफ जिल्ह्यात बलवान ठरणार का? बलवान ठरले तर पक्ष वाढवतील का? याचे उत्तर शोधण्याची वेळ येणार आहे.

कोल्हापूर हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. एकेकाळी दोन खासदार, तीन-चार आमदार असणारी राष्ट्रवादी आता जिल्ह्यात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे. त्यात राष्ट्रवादीत दोन गट पडल्याने कार्यकर्ता शोधण्याची वेळ इतर तालुक्यात आहे. जिल्ह्यात चंदगड आणि कागलमध्ये आमदार आहेत. तेही अजित पवार गटात सामील झालेत. नुकतीच झालेल्या शरद पवार यांच्या सभेत पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीला साथ दिली.

पण या सभेत राष्ट्रवादी कागलपूर्तीच मर्यादित ठेवली, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला. स्वतःवरचा डाग पुसण्यासाठी मुश्रीफ कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या तपोवन मैदान येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत 10 सप्टेंबरला सभा घेणार आहेत. दसरा चौक पेक्षा कैक पटीने तपोवन मैदान मोठे आहे. जिल्ह्यातील दोन आमदार, एक जिल्हाध्यक्ष , एक शहराध्यक्ष हे तपोवन मैदान खचाखच भरू शकेल का? असा सवाल उपस्थित होत आहे. कार्यकर्त्यांनी तपोवन मैदान भरले तर मुश्रीफ बलवान ठरतील का? ठरले तर पक्ष वाढवतील का? निष्ठावंत कार्यकर्त्यांसमोर टिकणार का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत.

मुश्रीफ यांचीच कबुली?

गेल्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या. त्यातील एक स्वाभिमानीला दिली. दोन जागांवर विजयी झालो. त्यामुळे राष्ट्रवादी वाढणार कशी? अशी अप्रत्यक्षपणे कबुली मुश्रीफ यांनी दिली.

एकीकडे मुश्रीफ शरद पवार यांच्यापासून बाजूला झाले असले तरी अजित पवार यांचा जिल्ह्यात गट वाढवण्यासाठी त्यांच्यापुढे आव्हान आहे. चंदगड, शिरोळ, कागल आणि राधानगरीचा भाग सोडला तर जिल्ह्यातील इतर तालुक्यात राष्ट्रवादीला चेहरा नाही. त्यात दोन गट पडल्याने राष्ट्रवादीचे अस्तित्व काय अशी म्हणायची वेळ आली आहे? कोल्हापूर शहराचा विचार केला तर दोन प्रमुख माजी नगरसेवकांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. करवीर तालुक्याचा विचार केला तर पहिल्यापासूनच काँग्रेसच्या दोन मातब्बर, आणि शिंदे गटाचा एक मातब्बर आहे. दक्षिण मध्ये ही तीच अवस्था आहे. शाहुवाडी, पन्हाळा तालुक्यात देखील राष्ट्रवादीला मोठा चेहरा नाही. या सर्वांचा विचार केला तर केवळ शरद पवार यांच्याकडेच नाही तर अजित पवार यांच्या गटाकडे मोठे चेहरे तालुक्यात नाहीत. अशावेळी मुश्रीफ अजित पवार यांचा गट जिल्ह्यात कसा वाढवणार हेच पाहणे महत्वाचे आहे.

लोकांची सहानभूती शरद पवारांना?

शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गटाने शिंदे गटावर अत्यंत जहरी भाषेत टीका सुरू केली आहे. त्यामुळे ठाकरे गटावरची सहानुभूती कमी होत चालली आहे. पण राष्ट्रवादीच्या बंडखोरीनंतर शरद पवार यांची संयत भूमिका राष्ट्रवादीला जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांकडून सहानुभूती मिळवून देत आहे. अशा परिस्थितीत अजित पवारांचा गट वाढणार कसा? हे पाहणे हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT