Hasan Mushrif-Samarjit Ghatge Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : मुश्रीफांना भलताच कॉन्फिडन्स; ‘मीच होणार पुन्हा कागलचा आमदार अन्‌ मंत्रिमंडळातही असणार’

Rahul Gadkar

Kolhapur, 05 August : कोण जिंकणार? ही जनता ठरवेल, 25 वर्षांच्या पुढील प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. अजित पवार गट आणि घड्याळ चिन्हावर माझा प्रचार सुरू झालेला आहे. माझ्याविरोधात कोण उभं राहणार, याची चिंता मी करत नाही.

तिरंगी, चौरंगी कशीही लढत होऊ दे, मी आमदार होणार आणि मंत्रिमंडळात असणार, असं खुलं आव्हान वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कागलमधील संभाव्य विरोधकांना दिले.

भाजप नेते समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीत कागलमधून उमेदवारीसाठी संपर्क केल्याची माहिती समोर आल्यानंतर घाटगे यांनी मी महायुतीचाच आहे. पुढचा आमदार मीच होणार, असे विधान केले होते. त्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी उत्तर दिले आहे. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात माध्यमाशी बोलताना मुश्रीफ यांनी संभाव्य वाटचालीबाबत भाष्य केले.

जरांगे पाटील यांच्या वक्तव्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर समाजामध्ये तेढ वाढविणे योग्य नाही. प्रत्येकाने आपल्या भाषेवर आणि तोंडावर संयम ठेवला पाहिजे. ज्या पद्धतीने वक्तव्य होत आहेत, हे अत्यंत खेदजनक आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत बहुरंगी लढती होतील. आता कोणी थांबायला तयार नाही. आठ ते दहा पक्ष झाले आहेत. तिसरी आघाडी, चौथी आघाडी तयार होईल. या निवडणुकीत अनेक उमेदवार उभे असतील. बच्चू कडू यांनीही काही दिवसांपासून वेगळी भूमिका घेतली आहे. ते तिसरी आघाडी करू शकतात. असंही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

ठाकरे गटाचे नेते, माजी आमदार संजय घाटगे यांनी हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला आहे. त्याबाबत मुश्रीफ यांनी संजय घाटगे यांचे आभार मानले. संजय बाबा घाटगे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते आहेत आणि त्यांनी मला उघडपणे पाठिंबा देण्याचे धाडस दाखवले आहे. त्यांच्या पाठिंबामुळे मला विधानसभा निवडणुकीत बळकटी मिळेल. हत्तीचे बळ प्राप्त होईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

मी पुन्हा विशाळगडावर जाण्याची काही गरज नाही. पालकमंत्री म्हणून मी त्यांना विनंती करेन. पालकमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस यांसह अनेक पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन आले आहेत. आता वातावरण शांत झाले आहे. त्यांनी विशाळगडावर जाऊन शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती मुश्रीफ यांनी अबू आझमी यांना केली.

माजी मंत्री अनिल देशमुख यांना हे सर्व काढायचं होतं, तर यापूर्वीच काढायला हवं होतं. इतके दिवस थांबण्याची गरज नव्हती. निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्याचं काम अनिल देशमुख करत आहेत, असा आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केला.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT