Kolhapur Political News :  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hatkanangale Politics : महायुतीतल्या आजी माजी आमदार-खासदारांमध्येच जुंपली; कोण कुणाची कळ काढतंय?

Kolhapur Political News : उमेदवारीवरुन महायुतीत धुसफूस...

Chetan Zadpe

Kolhapur News : आगामी लोकसभेच्या तोंडावर हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आपल्या पुत्राला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा असली तरी त्यांनी आतापासूनच महाविकास आघाडी आणि विरोधातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर टीका करण्यापेक्षा महायुतीतीलच सहकाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

एकीकडे भाजपच्या अधिक जवळ गेल्याने आवाडे यांना भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनीच उपरोधिक टोले लगावण्यास सुरुवात केली आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने आणि आवाडे यांच्यात उमेदवारीवरून रंगलेल्या चर्चेने आता आरोप-प्रत्यारोपांची जागा घेतल्याने हातकणंगलेतील लोकसभा यंदा पश्चिम महाराष्ट्रात चर्चेची विषय ठरणार हे नक्की. (Hatkanangale Political News)

महायुतीतील एकजूट दाखवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रत्येक जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी एकत्र मेळावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार 14 फेब्रुवारी रोजी पार पडला. या मेळाव्यात हातकणंगले भाजपचे वरिष्ठ नेते माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी इचलकरंजीचे भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांना चिमटा काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप आमच्यापेक्षा आवाडे यांना जास्त कळतो, अशा शब्दात टोला लगावला होता. त्यांच्या या विधानाची जिल्ह्यात चर्चा झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर नुकत्याच शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार प्रकाश आवाडे यांनी, "पंतप्रधान मोदी यांची जगात भारी अशी त्यांची चर्चा आहे; पण स्थानिक पातळीवर इथे कोण आहे? ते आपल्याला काय देणार? आतापर्यंत त्याने काय दिले, याची उत्तरे लोक मागणार आहेत, भाजपच्या जनसंपर्क अभियानातून घरोघरी चाललेल्या कार्यकत्याना विचारा. लोक हळूच यांना बदला म्हणून सांगत आहेत, अशी गंभीर टीका करत आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने यांचे नाव टोला लगावला होता.

तर दुसरीकडे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना सुद्धा आवाडे यांनी खडे बोल सुनावत खंत व्यक्त केली होती. चार हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करतयं, हे सगळ्यांना माहिती आहे. दरम्यान या सर्व प्रकरणावर विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनी आमदार प्रकाश आवाडे यांना योग्य वेळी उत्तर देऊ. अशा शब्दात प्रतिक्रिया दिली होती. तर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी, यापुढे त्यांच्याकडून अशी वक्तव्य होणार नाहीत याची काळजी आम्ही घेऊ, असा इशाराच दिला आहे.

वास्तविक पाहता जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे. तसतशी त्याची रंगत अधिक वाढू लागली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये स्वाभिमानी आणि महायुती अशी लढत निश्चित मानली जात आहे. एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghtana) शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ध्येयधोरणावर टीका करत आहे. पण दुसरीकडे हातकणंगले महायुतीमध्ये अंतर्गत चव्हाट्यावर आली आहे. आमदार प्रकाश आवाडे यांची पुत्र राहुल आवाडे हे भाजपकडून लोकसभेला इच्छुक आहेत.

भाजपने या मतदारसंघावर दावा केल्यानंतर त्यांची इच्छा आणखी प्रबळ झाली आहे. विद्यमान खासदारांचे महत्त्व कमी करण्यासाठी आमदार आवाडे यांच्याकडून अशी वक्तव्य येत आहेत का? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे. शिवाय विरोधकांवर निशाणा साधने ऐवजी आमदार आवाडे हे आतापासूनच महायुतीतील नेत्यांनाच टार्गेट करत सुटलेत. याचा अर्थ काय घ्यायचा?

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT