Solapur, 21 September (संदीप गायकवाड) : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची निवडणुकीपूर्वीची शेवटची सर्वसाधारण सभा प्रशासक कुंदन भोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात बाबूराव बोत्रे पाटील यांच्या ओंकार ग्रुपच्या कारखान्यांना देण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा विषय प्रचंड गाजला. शेतकऱ्यांच्या संस्थांना कर्जासाठी अडचणी येत असताना जिल्ह्याबाहेरील कारखान्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्जे का दिले?, असे सवाल करत आमदार अभिजीत पाटील यांनी प्रशासक भोळे यांना धारेवर धरले. कर्जाच्या मुद्द्यावरून प्रशासक कुंदन भोळे व सभासदांमध्ये जोरदार वादावादी झाली. शेवटी पोलिसांनी घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 108 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. निवडणुकीपूर्वीची ही शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा होती, त्या सभेला बहुतांश माजी संचालकांनी दांडी मारली. मात्र माढ्याचे आमदार अभिजीत पाटील, माजी आमदार धनाजी साठे, दादासाहेब साठे व सभासद उपस्थित होते. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी विषयपत्रिकेचे वाचन करून बँकेच्या प्रगतीचा आढावा सभेसमोर सादर केला.
जिल्ह्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती असून शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज फेडणे शक्य नाही, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट दोन लाख रुपयांची कर्जमाफी द्यावी, असा ठराव आमदार अभिजित पाटील यांनी मांडला. त्याला भारत शिंदे यांनी अनुमोदन दिले.
जिल्ह्याबाहेर दिलेल्या कर्जाच्या मुद्यावर सभेत वादळी चर्चा झाली. शेतकऱ्यांच्या संस्थांना कर्जासाठी अडचणी येत असताना जिल्ह्याबाहेरील कारखान्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज का दिले जाते?, असा सवाल सभासदांनी उपस्थित केला. आमदार अभिजित पाटील यांनीही यावर प्रश्न उपस्थित करताना, शेतकऱ्यांची बँक असताना एकाच ग्रुपला कोट्यवधींची कर्जे कशी दिली जातात? शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित का ठेवले जाते, असा सवाल केला.
ओंकार ग्रुपच्या कारखान्यांना दिलेल्या कर्जाबाबतही त्यांनी आक्षेप नोंदविला. संबंधित कर्जाच्या तुलनेत तारण मालमत्तेचे मूल्य पुरेसे नसल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. मोलॅसिसच्या साठ्याबाबतही आमदार पाटील म्हणाले, संबंधित कारखान्यांकडे मोलॅसिस शिल्लक नसताना त्यांना कर्जे कशी देण्यात आली?, त्याची माहिती घेतली का? आणि त्यांची कर्जे बेबाक कशी झाली?, असा सवाल त्यांनी केला. यावर प्रशासक भोळे यांनी, असा प्रकार आढळल्यास ती बँकेची फसवणूक मानून संबंधित कारखान्यांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल, असे स्पष्ट केले.
प्रशासकांच्या अभिनंदनाचा ठराव
प्रशासकांच्या कार्यकाळात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ठेवी १५०० कोटी रुपयांवरून ५००० कोटी पेक्षा अधिक वाढल्याबद्दल सभासदांनी प्रशासक कुंदन भोळे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. टाळ्यांच्या गजरात ठरावाचे स्वागत करण्यात आले.
जिल्हा बँकेला १४ कोटींचा निव्वळ नफा
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय नफा वाढ नोंदविली आहे. नफा १४ कोटी ३ लाख ३४ हजार रुपयांवर पोहोचला आहे.
ठळक घडामोडी
* कर्जाच्या मुद्द्यावरून प्रशासक कुंदन भोळे व सभासदांमध्ये वादावादी, घटनास्थळी पोलिस.
* आमदार अभिजीत पाटलांनी बँक शेतकऱ्यांची आहे, पोलिसांची गरज काय? सांगत वाद थांबवला.
*सभेच्या शेवटी कुंदन भोळे यांनी व्यक्त केली दिलगिरी.
* प्रशासकांच्या कालावधीत पहिल्यांदाच चालली सभा चार तास.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.