Mahesh Kothe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

महेश कोठे यांच्या मोबाईलवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ ची हॅलो टोन

महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर झाल्यानंतर आपल्याला आमदारकी मिळेल, असा विश्वास कोठे यांना आहे.

सरकारनामा ब्यूरो

सोलापूर : माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांनी राजकीय हवा ओळखून २०१९ च्या निवडणुकीपूर्वी शिवबंधन हाती बांधले होते. पण हाती शिवधनुष्य घेऊनही आमदारकीची इच्छा पूर्ण न झाल्याने शिवबंधन सोडून घड्याळ घालण्याचा निर्णय घेतला आहे. महेश कोठे यांचा व त्यांच्या समर्थक आठ ते दहा नगरसेवकांचा महापालिकेची मुदत संपल्यानंतर राष्ट्रवादीत (ncp) प्रवेश होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, अद्यापपर्यंत तसे काहीच झालेले नाही. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश होणार की पुन्हा रखडणार अशी चर्चा रंगली. मात्र, त्यांनी स्वत:च्या मोबाईलची हॅलो टोन मात्र ‘राष्ट्रवादी पुन्हा’ ही ठेवत त्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न कोठे यांनीच केल्याचे बोलले जात आहे. (Hello tone of NCP song on Mahesh Kothe's mobile)

सोलापूर शहरात वर्षानुर्षे काँग्रेसला ताकद देणारे महेश कोठे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोलापुरात काँग्रेस पक्षाची पिछेहाट सुरु झाली. सोलापूर शहरात कोठे समर्थकांची मोठी ताकद आहे. विशेषत: शहर उत्तर, शहर मध्य व पूर्व भागात कोठे यांना मानणारे कार्यकर्ते बहुसंख्येने आहेत. महापालिकेत कधीही दुसऱ्या क्रमांकावर येऊ न शकलेली शिवसेना त्यांच्यामुळे दुसऱ्या क्रमाकांवर पोचली. मात्र, त्या ठिकाणीही स्वप्नपूर्ती होऊ न शकलेल्या कोठेंनी आपला मोर्चा राष्ट्रवादीकडे वळविला आहे.

कोठे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप अधिकृतपणे प्रवेश झालेला नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांनी महापालिका निवडणुकीची सर्व सूत्रे त्यांच्याच हाती सोपवली आहेत. त्यामुळे महापालिकेचा कालावधी संपल्यानंतर कोठे आणि त्यांच्या समर्थक नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मात्र, अजूनही तरी तसे होऊ शकलेले नाही, त्यामुळे चर्चांना उधाण आले होते. मात्र, कोठे यांनी आपल्या मोबाईलची हॅलो टोन राष्ट्रवादी पुन्हा ही ठेवत आपली भूमिका स्पष्ट असल्याचे सूचित केले आहे.

दरम्यान, महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर झाल्यानंतर आपल्याला आमदारकी मिळेल, असा विश्वास कोठे यांना आहे. शहर उत्तरमधून कोठे निवडणूक लढवू शकतात, पण त्याठिकाणी त्यांना आनंद चंदनशिवेंचा अडथळा राहणार आहे. त्यामुळे ते शहर उत्तर किंवा शहर मध्यमधून लढतील की विधान परिषदेवर त्यांना संधी मिळेल, याचे उत्तर वेळच देऊ शकेल.

दुसरीकडे, मुस्लिम समाजाचे सर्वाधिक प्राबल्य असलेल्या शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आमदारकीला सर्वाधिक संघर्ष पहायला मिळेल. ॲड. बेरिया, माजी नगरसेवक तौफिक शेख यांनाही याच मतदारसंघातून उमेदवारी हवी असल्याचे बोलले जात आहे. तौफिक शेख यांना २०१४ च्या निवडणुकीत चांगली मते मिळाली होती. पण, आता मुस्लिम नेत्यांना आमदार प्रणिती शिंदे यांच्याबरोबरच फारुख शाब्दी यांचे कडवे आव्हान असेल. हा मतदारसंघ आघाडीत काँग्रेसकडे आहे, त्यामुळे राष्ट्रवादीत गेलेल्या मुस्लिम नेत्यांना त्याठिकाणी संधी मिळेल का, हादेखील प्रश्न अनुत्तरितच आहे. महापालिका निवडणुकीनंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ आणि उमेदवारीचा प्रश्न राष्ट्रवादी कसा सोडवणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT