Solapur, 29 August : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा पणन, कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघ हा माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कारण, ते या मतदारसंघातून २००५, २०१० आणि २०१५ च्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. सोलापूर जिल्हा सहकारी बॅंकेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून ‘डीसीसी’ची सर्वात मोठी ‘हाय व्होल्टेज’ लढत होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत या मतदारसंघात रणजितसिंह मोहिते पाटील आणि आमदार समाधान आवताडे यांच्यात लढत झाली होती. ती पुन्हा होणार का, याकडे संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
पणन, कृषी प्रक्रिया संस्था या मतदारसंघात खरेदी-विक्री संघ, सहकारी साखर कारखाने, ऑइल मिल, सूतगिरण्या, शेतीमाल प्रक्रिया संस्थांचा समावेश आहे. जिल्हा बँकेच्या सभासद असलेल्या १४० संस्थांचा या मतदारसंघात समावेश आहे.
आगामी निवडणुकीसाठी सध्या ९१ संस्था पात्र ठरल्या आहेत, तर ४९ संस्था अपात्र ठरल्या आहेत. या मतदारसंघातून रणजितसिंह मोहिते-पाटील लढणार की अन्य कोण? याबद्दल तर्क-वितर्क लढविले जात आहेत.
जिल्हा बॅंकेसाठी पणन, कृषी प्रक्रिया संस्था मतदारसंघातून २०१५ मध्ये रणजितसिंह मोहिते-पाटील विरुद्ध समाधान आवताडे अशी लढत झाली होती. त्या लढतीत मोहिते-पाटील यांना ३१, तर आवताडे यांना १३ मते मिळाली होती.
मंगळवेढ्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांवर आजही डीसीसीचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांचे वर्चस्व आहे. भाजप आमदार आवताडे यांना डीसीसीत येण्यासाठी अन्य मार्गांची चाचपणी करावी लागणार आहे. या मतदारसंघातून भाजपकडून कोण उमेदवार असणार? याबद्दलही उत्सुकता आहे.
कोणत्या तालुक्याची किती ताकद, कंसात पात्र सभासद
अक्कलकोट : ५ (२)
बार्शी : १६ (१३)
करमाळा : ६ (५)
माळशिरस : २४ (२०)
माढा : २२ (१६)
मंगळवेढा : १० (८)
मोहोळ : १० (४)
पंढरपूर : ११ (६)
सांगोला : १४ (९)
उत्तर सोलापूर : १३ (५)
दक्षिण सोलापूर : ९ (३)
एकूण : १४० (९१)
अकरा वर्षांत काय बदलले
रणजितसिंह मोहिते-पाटील : राष्ट्रवादी काँग्रेसकडून २००४ ते २००९ विधान परिषद सदस्य आणि २००९ ते २०१२ राज्यसभा सदस्य म्हणून काम पाहिल्यानंतर मोहिते-पाटील यांनी २०१५ मध्ये डीसीसीची निवडणूक लढविली. त्यानंतर २०२० ते मे २०२६ पर्यंत भाजपचे विधान परिषद सदस्य म्हणून काम पाहिले.
समाधान आवताडे : शिवसेनेकडून २०१४ मध्ये पंढरपूरची विधानसभा निवडणूक लढवत ४० हजार ९१० मते घेतली. त्यानंतर २०१५ मध्ये डीसीसीची निवडणूक लढविली. २०१९ मध्ये पंढरपूरमधून अपक्ष लढताना ५४ हजार १२४ मते घेतली. २०२१ च्या पोटनिवडणुकीत भाजपकडून आमदार झाले. त्यानंतर २०२४ मध्येही भाजपकडून आमदार झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.