Dhananjaya Mahadik-election machine
Dhananjaya Mahadik-election machine Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

मोहोळच्या पेनूरमध्ये रंगणार ‘हाय व्होल्टेज’ फाईट; महाडिकांची भूमिका ठरणार महत्वाची!

राजकुमार शहा

मोहोळ (जि. सोलापूर) : मोहोळ (mohol) तालुक्यातील नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद (ZP) आरक्षणामुळे (Reservation) प्रस्थापितांना धक्का बसला असून, त्या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटापैकी केवळ पेनूर हा एकमेव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाल्याने त्या ठिकाणी मोठी रस्सीखेच होणार आहे. या ठिकाणच्या हाय व्होल्टेज लढती वर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (A 'high voltage' fight will take place in Mohol's Penur)

माजी सभापती मानाजी माने, ग्रामपंचायत सदस्य रामदास चवरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश चवरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सागर चवरे, शिवसेनेच्या सावंत गटाचे माजी तालुकाप्रमुख चरणराज चवरे, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, माजी तालुका पंचायत समिती सदस्य माऊली चव्हाण, सचिन चवरे या दिग्गजासह अनेक गेटकेन उमेदवारांना या मतदार संघातून निवडणुक लढविण्याचे डोहाळे लागले आहेत. गेल्या वेळी या मतदारसंघाचे नेतृत्व शिवाजी सोनवणे यांनी केले होते. मात्र, त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा फारसा विकास झाला नाही.

आष्टी- जिल्हा परिषद गट हा अनुसूचित महिलेसाठी राखीव झाला आहे. गेल्या वेळी या मतदारसंघाचे नेतृत्व सभापती विजयराज डोंगरे यांनी केले होते. त्यांच्याच हातात जिल्हा परिषदेच्या तिजोरीच्या चाव्या असल्याने त्यांनी मोहोळ तालुक्यातील विविध विकास कामांसाठी झुकते माप देऊन कुठलाही भेदभाव न करता मोठा निधी खेचून आणला आहे. त्यांना मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले आहे. पोखरापूर-जिल्हा परिषद गट हा नव्याने निर्माण झाला आहे. अनगर ग्रामपंचायतचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने हा गट नवीन तयार झाला आहे. हा गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाचे सोमेश क्षीरसागर, गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे आमदारकीचे उमेदवार म्हणून चर्चेत राहिलेले भारत सूतकर हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. दोघांची ही पाटी कोरी आहे. सुतकर व क्षीरसागर यांचे सामाजिक काम चांगले आहे.

कामती-जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. गेल्या वेळी या मतदारसंघाचे नेतृत्व उद्योजक (स्व.) तानाजी खताळ यांनी केले होते. या वेळी त्यांच्या पत्नी विमल खताळ या राष्ट्रवादीकडून, तर सध्याचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख अशोक भोसले यांच्या पत्नी सुनीता भोसले या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. (स्व.) खताळ यांनी भाजपच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा विकास निधी मोठ्या प्रमाणात खेचून आणला होता. संपूर्ण जिल्ह्यात चर्चेत असलेला नरखेड-जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला आहे. गेल्या वेळी या गटाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले होते. त्यांनी मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. विकास निधी ही मोठ्या प्रमाणात खेचून आणला आहे, तर जिल्हा पारिषदेच्या अनेक योजना राबविल्या आहेत. हा गट सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या ठिकाणाहून उमेश पाटील यांच्या मातोश्री निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कुरुल गट हा विरोधकांचा मतदारसंघ म्हणून कायम चर्चेत असलेला हा मतदारसंघ नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. गेल्या वेळी या मतदार संघाचे नेतृत्व शैला गोडसे यांनी केले होते. त्यांच्या कार्यकालात मतदार संघाचा फारसा विकास झाला नाही. असे जरी असले तरी राज्यसभेचे नूतन खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा परिवाराचा कुरूल, पेनूर या जिल्हा परिषदेच्या मतदार संघात मोठा प्रभाव आहे. त्यामुळे खासदार महाडिक यांचीही भूमिका या जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकांत महत्वाची असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT