Eknath Shinde-Abdul Sattar
Eknath Shinde-Abdul Sattar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बंडखोर आमदारांच्या घोळक्यातून दोन आमदार कसे सटकले : अब्दुल सत्तारांनी सांगितला किस्सा

सरकारनामा ब्युरो

पुणे - राज्यातील शिवसेनेत बंड झाले. त्यामुळे राज्यातील सत्ता व राजकीय गणिते बदलली. मात्र शिवसेनेचे हे 40 बंडखोर आमदार एक-एक करत राज्याची नाकेबंदी तोडून सुरत व गुवाहाटीमध्ये कसे गेले याचा किस्साच माजी मंत्री तथा बंडखोर आमदार अब्दुल सत्तार ( Abdul Sattar ) यांनी एका मुलाखतीत ऐकविला. ( How did two MLAs get out of the backdrop of rebellious MLAs: Abdul Sattar told the story )

अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, ज्या दिवशी विधानपरिषदेसाठी मतदान झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे थोडे नाराज दिसले. बाकी शिवसेनेचे तीन नेते मधे बसले आणि एकनाथ शिंदे आमदारांसोबत बाहेर बसले. ते थोडे नाराज दिसले. ही परिस्थिती ज्यावेळी घडली. त्यामुळे निवडणुकीचा निर्णय लागण्या आधीच आमचा निर्णय लागून गेला.

त्यांनी पुढे सांगितले की, मी दादा भुसेंसोबत बसलो होतो. मी, दादा भुसे, अजित पवार, जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे काही नेते असे आम्ही दीड-दोन तास बसलो. मी त्यांना सांगू लागलो की, प्रासंगिक करार संपू लागला आहे. हे थोडे थोडे जयंत पाटील यांना समजू लागले. जयंत पाटील म्हणाले, तिकडचा प्रासंगिक करार संपला तर आमच्याकडे या, असे ते हसत बोलले. मी म्हणालो जरुर त्याच्यावरही विचार करू, असा खुलासाही त्यांनी केला.

शिंदेनी सुरवातीला सांगितले की, आपल्याला ठाण्यात बसून चर्चा करायची आहे. नंतर सांगितले एका हॉटेलमध्ये जायचे आहे. तिथे चर्चा करायची आहे. असे करत मुख्यमंत्र्यांचा फोन आला. त्यांना सांगितले की, आमचा मोटे नावाचा जिल्हा परिषद सदस्य आहे. त्यांच्या कार्यक्रमाला आम्ही वसई विरारला चाललो आहोत. त्यामुळे त्यांनी सांगितले पहा काही तरी गडबड आहे. मी म्हंटलो काही गडबड नाही. आमची गाडी सरळ चालू आहे, असे मी त्यांना सांगितले होते.

आम्ही हॉटेलमध्ये आल्यावर सर्व बाजूने आमदारांच्या गाड्या आल्या. त्याच वेळी नाकाबंदी करण्याचा आदेश वरून आला. महाराष्ट्राच्या सीमेवर नाकाबंदी करायला पोलीस सज्ज झाले. एकनाथ शिंदे हेही मंत्री होते. अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. त्यांनी पर्याय शोधला आणि आम्ही काय चोर आहोत का, स्मग्लर आहोत का, आम्ही मंत्री आहोत. त्यामुळे आम्ही कुठेही जाऊ शकतो, असे ते म्हणाले. तेव्हा पोलीस बाजूला झाले. एसपी, डिवायएसपींशी बोलून एक लाईन आमच्यासाठी मोकळी करून दिली. गुजरातमध्ये गेल्यावर सर्व गुजराती पाट्या दिसू लागल्या. गुजरातमध्ये जाईपर्यंत आम्हालाही कळाले नव्हते की आम्ही गुजरातला चाललो आहोत, असे त्यांनी सांगितले.

नाकाबंदीच्या वेळी ट्राफिकमधून लाईन बदलताना सात-आठ मिनिटे लागतात. यातच उस्मानाबादचा आमदार कैलास पाटील हा लघवीचा बहाना करत उतरला व पळत सुटला. एकनाथ शिंदे म्हणाले, "त्याला जाऊ द्या. त्याची इच्छा दिसत नाही." मग आम्हाला गुजरात सरकारचे पोलीस दिसले. तिथे आमच्यासाठी तयारी पूर्ण झाली होती. मला आश्चर्य वाटले, असे त्यांनी स्पष्ट केले.

गुजरातच्या पोलिसांसमोर आम्ही गेलो. तेथील एका हॉटेलमध्ये गेलो. आमचा नितीन देशमुख नावाचा आमदार म्हणू लागला माझी छाती दुखू लागली. तो बेचैन झाला होता. एकनाथ शिंदे यांनी त्याला विचारले तुझी अडचण काय आहे. तो म्हणाला, मला माझ्या बायकोला भेटायला जायचे आहे. तो बेचैन झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तो म्हणाला, मला माझ्या बायको जवळच जायचे. मग खासगी चार्टर प्लेन मागविण्यात आले. ठाण्याचे दोन कार्यकर्ते बरोबर दिले. त्याला विमानात बसून अकोल्याला पाठविले. तो माझ्या गाडीत होता. त्याने आई-बापाची शपथ घेऊन सांगावे, असेही आव्हान सत्तार यांनी दिले.

नितीन देशमुखला विमानातून पाठवून दिल्यावर एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना विचारले की अजून कोणाला जायचे आहे. मला तुम्हाला बदनाम करायचे नाही. जी काही चूक आहे ती सर्व मी स्वीकारायला तयार आहे, असे शिंदेनी स्पष्ट केल्याने कोणीही गेले नाही.

शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांतील एकनाथ शिंदे यांच्या बरोबर वाद सुरू होता. शिंदेचा अधिकार काढून घेण्यासारखे प्रकार वाढले होते. एकनाथ शिंदे हे पुढील निवडणुकीत 50 आमदारांचे 100 आमदार करायलाही कमी पडणार नाही, असा विश्वास सत्तार यांनी व्यक्त केला.

जाणारे विमाने व येणारे अॅम्ब्युलन्समध्ये

दोन आमदार आमच्यातले गेल्यावर जळगावमधील गुलाबराव पाटलांनी काही जण ट्रेनमध्ये आले. काही जण एसटीने आले काही लोक अॅम्ब्युलन्सने आले. म्हणजे लोकांची इच्छा होती, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT