-संदीप गाडवे
Jawali Political News : विकासकामे करताना ते गाव किती लोकसंख्येचे आहे, याचा कधीच विचार केला नाही. कै. भाऊसाहेब महाराज यांनी दिलेल्या शिकवणीनुसार विकासकामे करताना कधीच दुजाभाव केला नाही. लोकप्रतिनिधी या नात्याने जावळी तालुक्यात वाड्या-वस्त्यांवर लोकांच्या मागणीनुसार कामे केली आहेत. त्यामुळे जावळी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी भक्कमपणे असल्याने येणाऱ्या निवडणुकांमध्ये मला कुणाच्याही आव्हानांची भीती नाही, असा सूचक इशारा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना दिला.
मुकवली (ता. जावळी) Jawali येथे व्यायामशाळा उद्घाटन व विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale बोलत होते. या वेळी सुनील जांभळे, संतोष कासुरडे, विकास ओंबळे, उपसरपंच साहेबराव पवार, गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष महेंद्र पवार, विजय पवार यांची उपस्थिती होती.
आमदार भोसले म्हणाले, जावळी तालुक्यासाठी महत्त्वाच्या असलेले बोंडारवाडी धरण एक टीएमसी क्षमतेचे व्हावे, याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. हे धरण मार्गी लागल्यास स्थानिक युवकांना रोजगार मिळणार असून, पर्यटनालादेखील चालना मिळणार आहे.
विकासकामांमुळे माझी जावळीतील जनतेशी नाळ जोडली असून, मला निवडणुकीतील आव्हानांची भीती नाही. ग्रुप ग्रामपंचायत मुकवली येथे जल जीवन मिशन योजनेतून ५० लाखांचा निधी दिला असून, अंतर्गत रस्त्यांसाठी २० लाख रुपये निधी देण्यात आला आहे.
महाबळेश्वरला जोडणाऱ्या वाहिटे रस्त्याचा प्रश्नही लवकर मार्गी लावला जाईल. जावळी तालुका राज्यात विकासकामांच्या बाबतीत रोल मॉडेल करणार असून, विकासकामे करणाऱ्या लोकप्रतिनिधीला जावळी तालुक्याने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या वेळी आमदार भोसले यांचे मुकवली ग्रामस्थांनी पुष्पवर्षाव करून स्वागत केले. व्यायामशाळा उद्घाटन करण्यात आले. मुकवली गावाला भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल विजय पवार यांनी आमदार भोसले यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानले.
Edited By Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.