Sachin Kalyanshetti-Siddharam Mhetre Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kalyanshetti Vs Mhetre : असले रोज 56 भेटतात, त्यांना मी भीक घालत नाही : सचिन कल्याणशेट्टींचा सिद्धाराम म्हेत्रेंवर पलटवार

Akkalkot Political News : अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात पुन्हा शाब्दिक संघर्ष रंगला आहे. हुकूमशाहीच्या आरोपांवर कल्याणशेट्टींनी जोरदार पलटवार केला.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 18 July (प्रभूलिंग वारशेट्टी) : अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. अक्कलकोट आणि राज्यात हुकूमशाही सुरू आहे, अशी टीका म्हेत्रे यांनी केली होती. त्यावरून कल्याणशेट्टींनी जोरदार पलटवार करताना असले रोज 56 भेटतात, त्यांना मी भीक घालत नाही, असा दावा केला आहे.

दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेतील (स्व.) सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या स्मारकाच्या जागेवर गणपती मंदिर उभारण्यात आले आहे. त्यावरून माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी कल्याणशेट्टींवर हुकूमशाहीचे आरोप केले होते. त्याला गजानन महाराजांच्या पालखी दर्शनासाठी आलेले कल्याणशेट्टी यांनी उत्तर दिले आहे.

अक्कलकोटमध्ये हुकूमशाही असते, तर सिद्धाराम म्हेत्रे यांना आम्ही बोलू दिले असते का, असा सवाल करत लोकशाही आहे म्हणूनच ते बोलत आहेत असा टोला कल्याणशेट्टींनी लगावला. सिद्धाराम म्हेत्रे हे २०१९ पासून भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र त्यांना प्रवेश मिळू शकला नाही. त्यानंतर दोन्ही निवडणुका ते मोठ्या फरकाने ४० ते ५० हजारांच्या फरकाने हरले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, भाजप प्रवेश होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर म्हेत्रे यांनी उपमुख्यमंत्री (स्व) अजितदादांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी प्रयत्न केले. पण, अजितदादांनीही त्यांना घेतले नाही. त्यानंतर काहीतरी पदरात पडेल या अपेक्षेने ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. पण, तसे झाले नाही. त्यांचे बंद पडलेले व्यवसाय सुरू होतील, अशी अपेक्षा होती. पण तेही झाले नाहीत. त्यामुळे ते व्यथित होऊन बोलत आहेत, त्यामुळे व्यथित झालेल्या व्यक्तीबद्दल न बोललेलेच बरे.

पूर्वीच्या सरकारच्या काळात अनेकजण पालकमंत्र्यांच्या भूमिकेत होते. मात्र, आमच्याकडे जयकुमार गोरे हे एकच पालकमंत्री आहेत, असेही कल्याणशेट्टी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, माझा जन्म हिंदू धर्मातला आहे. मार्केट कमिटीची सत्ता आमची आहे. गणपती प्रतिष्ठापनेची मार्केट कमिटीतील व्यापारी असोशिएशनची इच्छा होती. त्याप्रमाणे त्या जागेवर गणपती मंदिर उभारले आहे.

ते म्हणाले, अपेक्षाभंगामुळे निराश झालेल्या माणसाबद्दल मी काय बोलणार. दुधनीत मी यापूर्वी दहा वेळा आलो आहे. आमदार नसताना आलो आहे. आता तुमची मार्केट कमिटीतील सत्ता घालवली आहे. मार्केट कमिटी जिंकली. तुमच्या पुतण्याला, भावाला, तुम्हाला स्वत:ला दोनवेळा पाडले. जेव्हा-जेव्हा मी दुधनीत आलो, तेव्हा काय-काय करिश्मा झाला, हे सर्वांना माहिती आहे.

माझी तक्रार करायची असेल तर त्यांनी खुशाल माझ्या नेत्यांकडे, मुख्यमंत्र्यांकडे करावी. माझा नेता, माझी पार्टी, माझी जनता या तिघांना मी उत्तरदायी आहे. त्यांच्यासाठी मी सजग आहे. विरोधक म्हणून कुणी धमक्या देत असेल तर त्यांना मी भीक घालत नाही, असेही कल्याणशेट्टी यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT