

Solapur, 17 July : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आषाढी वारीच्या अगोदर नियोजनाचा आढावा घेण्याची प्रथा सुरू केली होती. ती प्रथा त्यांनी उपमुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम राखली आहे. आषाढी वारीच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या रविवारी (ता. १९ जुलै) पंढरपूरच्या दौऱ्यावर येत आहेत.
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात सध्या अधिकारी आणि मंत्र्यांची लगबग सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी (ता. १६ जुलै) तयारीचा आढावा घेतला. तसेच अधिकाऱ्यांना काही सूचनाही केल्या. परवा मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. मात्र त्यावेळी व्हीआयपी दर्शनावरून मोठा गदारोळ झाला.
पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हा कार्तिकेयन एस. यांनी यापुढे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. संतांच्या पालख्या जसजशा सोलापूर जिल्ह्यात येतील, तसतशी मंदिरात दर्शनासाठी गर्दी वाढण्याची चिन्हे आहेत. त्याच्या नियोजनाची गरज आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आषाढी वारीचा मोठा कार्यक्रम होता, त्यावेळी त्यांनी प्रथमच आषाढी वारीच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी एकादशीच्या काही दिवस अगोदर पंढरपूरचा दौरा केला होता. त्याअगोदरचे सर्व मुख्यमंत्री हे आषाढीच्या शासकीय महापुजेसाठी येत असत. मात्र शिंदे यांनी सर्वसामान्यांच्या वारकऱ्यांची सोय होते की नाही, याची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती.
त्याचवेळी शिंदेंच्या मंत्रिमंडळात असलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी वारकऱ्यांची आरोग्य सेवा करण्यासाठी पंढरपुरात महाआरोग्य शिबिर घेण्याची प्रथा सुरू केली. ती विद्यमान आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनीही जपली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या वेळी आषाढी वारीच्या नियोजनाची बैठक घेण्यासाठी येत्या १९ जुलै रोजी पंढरपुरात येणार आहेत. ते रविवारी सकाळी मुंबई विमानतळावरून सोलापूरमध्ये येणार आहेत. सोलापूरमधून ते हेलिकॉप्टरने पंढरपूरला जाणार आहेत.
पंढरपुरात एकनाथ शिंदे हे मंदिर परिसर, भीमा नदीच्या वाळंवाटात आणि दर्शनबारीच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करणार आहेत. ते मंदिरात जाऊन श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते आषाढी वारीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाय योजनांबाबत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.