Uttam Jankar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uttam Jankar : ‘मी 42 निवडणुका लढलो, त्यातील 36 हरलो; पण निवडणूक आयोगाविरोधात कधी बोललो नव्हतो; पण जिंकल्यावर राजीनामा दिला...’

NCP SP Nashik Shibir : उत्तम जानकर यांनी 42 निवडणुका लढवल्या असून 36 पराभव स्विकारले. 23 जानेवारी 2024 रोजी राजीनामा देऊन माळशिरस पोटनिवडणुकीची मागणी केली, परंतु निवडणूक आयोगाने प्रतिसाद दिला नाही.

Vijaykumar Dudhale
  1. उत्तम जानकरांचा आरोप – ४२ निवडणुका लढून ३६ पराभव पचवलेले राष्ट्रवादी (शरद पवार गट) आमदार उत्तम जानकर यांनी माळशिरस मतदारसंघातील मतदानात हेराफेरी झाल्याचा आरोप केला.

  2. राजीनामा व मागणी – २३ जानेवारी २०२४ रोजी आमदारकीचा राजीनामा देऊन फेरनिवडणुकीची मागणी केली तरी निवडणूक आयोगाने अद्याप उत्तर दिलेले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

  3. देशव्यापी मुद्दा – राहुल गांधींच्या “व्होटचोरी” आरोपांचा उल्लेख करत, मतमोजणी प्रक्रियेत भाजपा पक्षाला लाभ मिळाल्याचा आणि बॅलेट पेपरद्वारे मतदानाची मागणी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

Nashik, 14 September : मी माझ्या आयुष्यात एकूण 42 निवडणुका लढलो आहे. त्या 42 पैकी 36 निवडणुका मी पराभूत झालो आहे. पण, त्या वेळी मी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेच्या विरोधात कधीही ‘ब्र’ शब्द काढला नाही. पण, प्रथमच निवडून आल्यानंतर 23 जानेवारी 2024 रोजी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि माळशिरस मतदारसंघातून फेरनिवडणूक घेण्याची विनंती केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने मला साधं पत्र पाठविण्याचीही हिम्मत दाखवलेली नाही, असे माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नाशिक येथील कार्यकर्ता शिबिरात आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी बोलताना पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, दिल्लीत जाऊन मी निवडणूक आयोगाला विचारलं होतं. महाराष्ट्रात जसं घडलं आहे, तसं माझ्या माळशिरस मतदारसंघातही घडलं आहे. मी एक लाख २१ हजार मतांनी निवडून येणं अपेक्षित होतं. पण त्या अगोदर थोडी दुरुस्ती करतो, तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो.

मी माझ्या आयुष्यात एकूण ४२ निवडणुका लढलो आहे. आमचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) पुढे बसलेले आहेत, त्यांना सर्व माहिती आहे. त्या ४२ पैकी ३६ निवडणुका मी पराभूत झालो आहे. पण, मी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेच्या विरोधात कधीही ‘ब्र’ शब्द काढला नाही, असेही जानकर म्हणाले.

जानकर म्हणाले, राहुल गांधी यांनी आज संपूर्ण देशभरात व्होटचोरीच्या संदर्भाने आवाज उठवला आहे. कारण, महाराष्ट्राप्रमाणेच देशाचा कलही एका बाजूने होता आणि निकाल दुसऱ्या बाजूने येत होते. कोणाचा एक खासदार निवडून आला, त्याचे ४० ते ४२ आमदार कसे निवडून येतात, असा प्रश्न होता. यावर राहुल गांधी यांनी सहा महिने अभ्यास केला. मी मात्र दहा महिने अभ्यास केला आहे. राहुल गांधी यांनी हायड्रोजन बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले. पण माझ्याकडे अणुबॉम्ब नव्हे; तर परमाणुबॉम्ब आहे.

मारकडवाडीच्या लोकांचं म्हणणं होतं की आम्ही दिलेले मत गेले कुठे? त्याबाबत आम्हाला बॅलेट पेपरवर मतदान घेऊन बघायचे आहे. पण माझ्यासह अनेकांवर गुन्हे दाखल केले. मग आम्ही न्याय कोणाकडे मागायचा म्हणून मी २३ जानेवारी रोजी निवडणूक आयोगाचे कार्यालय गाठले आणि आमदारकीचा राजीनामा दिला.

माझ्या माळशिरस मतदारसंघात फेरमतदान घेण्याची मागणी केली. जिंकलेला आमदार राजीनामा देऊन निवडणूक घेण्याची मागणी करतोय, असं निवडणूक आयोगाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच घडलं असेल. पण, गेल्या आठ महिन्यांत निवडणूक आयोगाने मला साधं पत्र पाठविण्याची हिम्मत दाखवलेली नाही, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

उत्तम जानकर म्हणाले, भाजपला एक मतदान झाल्यानंतर दुसरं एक मत त्याच्या जोडीला आपोआप घेतले जात हेाते. राज्यात सगळीकडे वेगवेगळे प्रमाण लावले होते. बारामतीसारख्या ठिकाणी एकास दोन असं प्रमाण होतं. माझ्याविरेाधात एकास एक होतं. त्याचा शोध लावला नाही, तर उत्तम जानकर कसला. म्हणून मी त्याच्या तळाशी गेलो. राहुल गांधी यांनी आज चळवळ सुरू केली आहे, त्या वेळी मलाही तशीच चळवळ अपेक्षित होती. खासदार सुप्रिया सुळे यांनी मारकडवाडी ते मुंबई निघावं, असं वाटत होतं. लोकांचा आक्रोश बाहेर पडण्यासाठी जागा असायला पाहिजे.

प्र.1: उत्तम जानकर यांनी किती निवडणुका लढल्या आणि किती वेळा पराभूत झाले?
उ. – एकूण ४२ निवडणुका लढल्या, त्यापैकी ३६ वेळा पराभव पत्करला.

प्र.2: त्यांनी आमदारकीचा राजीनामा कधी दिला?
उ. – २३ जानेवारी २०२४ रोजी.

प्र.3: जानकरांची मुख्य मागणी काय आहे?
उ. – माळशिरस मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्याची.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT