Dhairyasheel Mohite Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Dhairyasheel Mohite Patil : मला ते देशाच्या पंतप्रधानांचे भाषण वाटलेच नाही; धैर्यशील मोहिते पाटील असं कोणाला म्हणाले?

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 August : विरोधी पक्षाच्या खासदारांनी मागणी करूनही पंतप्रधानांनी मणिपूर हिंसाचार आणि जेईई, नीट परीक्षेवर बोलले नाहीत. अडीच तासाच्या भाषणात ते केवळ दहा मिनिटे राष्ट्रपतीच्या भाषणावर बोलले. उर्वरीत वेळ त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यातच घालवला.

ज्येष्ठ नेते शरद पवार हे नवीन खासदारांची शाळा घेतात किंवा मार्गदर्शनही करतात. त्यांनी मलाही विचारले कसं वाटलं पंतप्रधानांचं भाषण. त्या वेळी ते पंतप्रधानांचे भाषण नव्हते, तर वैयक्तीक भाषण होते, असे मी स्पष्टपणे सांगितले. माझ्या मताशी पवारसाहेबांनीही सहमती दर्शविली, असा किस्सा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या पहिल्या संसद अधिवेशनाचा सांगितला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा (NCP's Shiva Swarajya Yatra) आज अकलूजमध्ये आले होती. त्या यात्रेच्या कार्यक्रमात बोलताना मोहिते पाटील यांनी संसद अधिवेशनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाबाबत भाष्य केले. देशात विरोधी पक्ष आता प्रबळ झाला आहे, हे आम्ही दिल्लीत आता जवळून अनुभवत आहेत, असेही धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी स्पष्ट केले.

मोहिते पाटील म्हणाले, मेडिकल विम्यावरही केंद्र सरकारने जीएसटी लावला आहे. जन्मापासून मरेपर्यंत लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर जीएसटी लावला गेला आहे. सर्व बाजूने ओरबडण्याचे काम जीएसटीच्या माध्यमातून केले जात आहे.

त्यावर सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता. पण अर्थमंत्र्यांनी हा प्रश्न झटकून टाकताना हा माझा निर्णय नाही, तो जीएसटी कौन्सिलचा निर्णय आहे, असे सांगितले. त्यावर उपाय काढण्यापेक्षा अर्थमंत्री सर्व विरोधी पक्षनेत्याशी भांडत होत्या.

नीरा देवघर धरणावरून होणाऱ्या जलवाहिनीच्या कामासाठी आपण केंद्र सरकारकडून पैसे आणणार आहोत, असे लोकसभा निवडणुकीपूर्वी सांगण्यात आले होते. फलटणला मोठा कार्यक्रम झाला आहे. मात्र, निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे यांनी याबाबत सचिवांना विचारले की, तुम्ही हे काम कधी करणार आहात, त्या वेळी सचिवांनी या योजनेसाठी केवळ शंभर कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. या योजनेसाठी तीन ते साडेतीन हजार कोटी रुपये लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, निधीची तरतूद होण्यापूर्वीच या लोकांनी टेंडर काढून रिकामे झाले होते. आमचा माळशिरस तालुका एवढा नटला की आता पाणी आलंच. पण योजनेसाठी पैसेच नाहीत. त्यानंतर मी आणि विजयसिंह मोहिते पाटील केंद्रीय सिंचन मंत्री सी. आर. पाटील यांना भेटून निधीची मागणी केली आहे.

महायुती नेत्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आगामी तीन महिन्यांत लय गोष्टी सांगणार आहेत आणि मोठंमोठे आकडे ऐकायला मिळणार आहेत, पण त्यामागे न जाता सच्चा राज्यकर्त्यांच्या पाठीमागे गेले पााहिजे. गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आपला एकोपा बिघडू नये, यासाठी सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे, असा सल्लाही धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT