Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore
Ramraje Naik Nimbalkar, Jaykumar Gore sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : त्यांची बैलाशी तुलना करून मी चूकच केली... जयकुमार गोरे

विशाल गुंजवटे

बिजवडी : बैल खूप प्रामाणिक असतो. शेवटपर्यंत तो काबाडकष्ट करतो. मात्र, आपल्या मालकाशी बेईमानी करत नाही. तुमच्यासारख्या बेईमानाची तुलना बैलाशी करुन मी चूकच केली, असा टोला भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंचे नाव न घेता लगावला.

आमदार गोरेंच्या विधानावर रामराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत गोरेंना प्रतिउत्तर देताना मोदींनीच गोरेंना मला बैल म्हणायचा अजेंडा दिला असेल, अशी खोचक टीका केली होती. रामराजेंच्या टीकेला आमदार गोरेंनी तातडीने प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले, बैल खूप प्रामाणिक असतो. आयुष्यभर काबाडकष्ट करुन मालकाशी इमानदारीने वागतो. मालकाशी तो बेईमानी करत नाही.

मालकाची कधी प्रतारणा करत नाही. त्यांच्यासारख्या बेईमानाची तुलना बैलाशी करुन मी चूकच केली आहे. त्यांनी सातारा जिल्ह्याशी कायम बेईमानी केली आहे. त्यांनी आपला जिल्हा बारामतीला गहाण टाकून इथल्या जनतेशी बेईमानी केली. मंत्री असताना माण, खटाव, फलटणसह इतर पाणीयोजना रखडवून आपल्या हक्काचे पाणी बारामती, सांगलीला देण्यात त्यांनी धन्यता मानली.

दुष्काळी जनतेशी इतकी मोठी बेईमानी आजपर्यंत कुणीच केली नाही. जिल्हा बॅंकेत बसून तुम्ही अनेकांच्या खोड्या काढता. तिथेच बसून तुम्ही अनेकांच्या विरोधात षडयंत्रे रचता. जिल्ह्यातील कुणाला आणि कसे अडचणीत आणायचे हे तुमच्याशिवाय इतर कुणालाच जमणार नाही. मला मोदींनी काय सांगितले याची काळजी त्यांनी करु नये.

परवा अजित दादांनी तुम्हा सगळ्यांना शिव्या घातल्यात, त्यामुळे तुम्हीच आता कामाला लागा. मोदींच्या आशिर्वादासाठी तुम्ही किती आतूर आहात हे आम्हाला चांगले माहित आहे. ज्या राष्ट्रवादीने तुम्हाला इतका सन्मान आणि पदे दिली. त्या राष्ट्रवादीला आणि पवारांना सोडून तुम्ही इकडे तिकडे हालचाली करता यातच तुमची इमानदारी दिसते असा टोलाही आमदार गोरेंनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT