Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale
Udayanraje Bhosale, Shivendraraje Bhosale design@apglobale.com
पश्चिम महाराष्ट्र

वाढदिवसाच्या कार्यक्रमात उदयनराजेंचा डोंबाऱ्याचा खेळ बघितला...

उमेश बांबरे : सरकारनामा न्यूजब्युरो

सातारा : कोणतीही निवडणूक आली की उदयनराजेंकडून कारखान्यांवर आरोप केले जातात. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालत असतील तर लोकसभेत त्यांचा पराभव का झाला आणि मी विधानसभा निवडणूकीत निवडून आलो, याचे उत्तर उदयनराजेंनी द्यावे. रात्रीचे गाडीत बसून हिंडायचे आणि मोठ्याने गाणी लावायची हे त्यांचे विचार आहेत का, असा प्रश्न करून वाढदिवसाच्या कार्यक्रमात उदयनराजेंचा डोंबाऱ्याचा खेळ बघितला आहे. आपण राज्यसभेचे खासदार आहात आणि आपण काय करतोय याचे भान ठेवावे, अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंवर केली आहे.

सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने साताऱ्यातील दोन्ही राजांत कलगीतूरा रंगला आहे. आता निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या असल्या तरी या दोन्ही राजांचे आरोप प्रत्योराप सुरूच आहे. काल उदयनराजेंनी कारखान्यांतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेऊन शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा नामोल्लेख टाळून टीका केली होती. आज सकाळी या टीकेला आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी सडेतोड उत्तर दिले.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, अजिंक्यतारा साखर कारखान्याबद्दल सभासदांनी तसेच कारखान्याला ऊस घालणाऱ्यांनी बोलावे. उदयनराजे सभासद नाहीत. त्यांनी कधीही ऊसाची शेती केलेली नाही. मुळात कारखान्याबद्दल त्यांचे आरोप नवीन नाहीत. पालिका निवडणूक लागली कारखान्यावर आरोप, बाजार समितीची निवडणूक लागली की कारखान्यावर आरोप, जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आली की कारखान्यावर आरोप करतात. पण कारखान्याची निवडणूक मात्र, बिनविरोध होते.

आम्ही ऊसाची एफआरपी दहाव्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो. मग, हा भ्रष्टाचार म्हणायचा का, असा प्रश्न करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजेंची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का. वय वाढले की बुध्दी भ्रष्ट व्हायला लागते, असे म्हणतात. मी अजून त्यांच्या लेवलला पोहोचलेलो नाही. त्यांचे बगलबच्चे अजूबाजूला गाडीत बसून खोटी माहिती देतात का, हे उदयनराजेंनी तपासावे.

कोरोनाच्या काळातही कारखान्याच्या कामगारांना महिन्याला पगार, अठरा टक्के बोनस दिलेला आहे. नेमका भ्रष्टाचार काय हे उदयनराजेंनी सांगावे. कारखान्यात भ्रष्टाचार झालाय हे बोलणारे उदयनराजे कोण, हा प्रश्न आमचे सभासद विचारतील. सभासद नसलेल्यांना विचारायचा अधिकार नाही. मी छत्रपतींच्या विचारांचा आहे का, हे विचारायचा अधिकार त्यांना कुणी दिलाय, असा प्रश्न त्यांनी केला.

ते जर एवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहेत, मग लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव का झाला आणि मी निवडून का आलो आणि तुम्ही का पडलात याचे उत्तर द्यावे. रात्रीचे गाडीत बसून हिंडायचे आणि मोठ्याने गाणी लावायची हे छत्रपतींचे विचार आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला. यात्रेत डोंबाऱ्याचे खेळ बघितलेत. तेच खेळ आम्ही वाढदिवसाच्या कार्यक्रमात उदयनराजेंचे डोंबाऱ्याचे खेळ बघितलेत. आपण राज्यसभेचे खासदार आहात आणि काय करतोय हे लक्षात ठेवावे.

अजिंक्यतारा कारखान्याला वर्षानूवर्षे ऊस घालणारे शेतकरी आहेत. आठ लाख टन ऊस जावळीतून येत आहे. उदयनराजेंचे कार्यकर्ते आम्हाला ऊस घालत नाहीत. त्यांच्या कार्यकर्त्यांचा ऊस घालवण्यासाठी उदयनराजे काय करतात. दुसऱ्या कारखान्यांकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम उदयनराजेंचे नाही का. त्यांनी किती लोकांना मदत केली हे दाखवावे, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. आम्ही सहकार मोडीत काढला असे ते म्हणत असतील तर माझ्या कार्यालयात येऊन मला जिल्हा बँकेत संचालक म्हणून घेतल्याबद्दल थँकू म्हणू बुके आणि डब्बे देऊन गेले. मग, सहकार मोडित काढला असेल तर कशाला आमचे अभिनंदन करायला आला होता, असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजेंनी केला.

ही तर भ्रष्टाचार विकास आघाडी...

सातारा विकास आघाडीचे नाव सातारा भ्रष्टाचार विकास आघाडी असे ठेवले पाहिजे, अशी खिल्ली उडवून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, त्यांच्या आघाडीने पालिकेत पाच वर्षे खाण्याशिवाय काहीही केलेले नाही. एकही काम पालिकेच्या माध्यमातून दिसण्यासारखे नाही. ग्रेड सेपरेटरचा सातारकरांना काहीही उपयोग होत नाही. केवळ स्वतःच्या लहरीपणामुळे त्यांनी हे काम केले असून त्यांची वाऱ्यावरची वरातीप्रमाणे हे वाऱ्यावरचे काम आहे, अशी टीका केली. या ग्रेडसेपरेटरमधून किती लोक जातात हे पहावे. सातारा पालिकेचा कारभार जगजाहीर आहे. त्यांचेच नगरसेवक एकमेकांवर आरोप करतात. यामध्ये जंतू नाशकाच्या टेंडरची माहिती सातारकरांनी घ्यावी, मग नेमका घोटाळा कोण करतंय हे समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT