Ajit Pawar-Videep Jadhav Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Videep Jadhav : ‘बारामतीची सभा आटोपली की घरी येतोय....’: अजितदादांच्या अंगरक्षकाची वडिलांशी भेट झालीच नाही

Ajit Pawar Death : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या विश्वासू अंगरक्षक विदीप दिलीपराव जाधव यांचा दुर्दैवी बारामती विमान अपघातात २८ जानेवारी २०२6 रोजी मृत्यू झाला. राज्यभर शोककळा पसरली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Satara, 28 January : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीत आज (ता. 28 जानेवारी) सकाळी झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत तब्बल सात वर्षांपासून सावलीसारखे असणारे अंगरक्षक विदीप दिलीपराव जाधव यांचाही मृत्यू झाला. जाधव हे अजितदादांचे केवळ सहकारीच नव्हते, तर विश्वासू सहकारीही होते. विदीप हे सोमवारी सुटीसाठी गावी आले होते. कामावर रुजू होण्यापूर्वी त्यांनी वडिलांना फोन करून सांगितले होते, की ‘बारामतीची सभा आटोपली की आज रात्री घरी येतोय;’ पण नियतीच्या मनात काही तरी वेगळेच होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या आज बारामतीत सभा होत्या, त्यासाठी ते मुंबईहून बारामतीला आले होते. त्यावेळी लॅडिंग करतानाच विमानाला अपघात झाला आणि त्यात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासोबत त्यांच्या पाच सहकाऱ्यांचा अंत झाला. त्यात सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील तरडगाव येथील विदीप दिलीपराव जाधव यांचा समावेश होता. जाधव हे अजितदादांचे केवळ अंगरक्षक नव्हे तर एक विश्वासू सहकारीही होते. कर्तव्य निभावत असताना दोघांचा एकत्रच मृत्यू झाला.

महाराष्ट्राच्या पोलिस दलात विदीप जाधव (Videep Jadhav) हे २००९ मध्ये दाखल झाले होते. चोख काम करण्याची पद्धत आणि शिस्त यामुळे विदीप यांना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळाल्या. न्यायाधीश जे. एन. सानप यांचे अंगरक्षक (पीएसओ) म्हणून विदीप यांनी २०१० ते २०१३ या काळात काम केले. त्यानंतर २०१४ ते २०१९ या कालावधीत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यानंतर २०१९ पासून विदीप जाधव हे आजअखेर अजित पवार यांच्यासोबत सावलीसारखे होते.

अजितदादांचा विदीप जाधव यांच्यावर प्रचंड विश्वास होता. विदीप यांना अडीच महिन्यांपूर्वी जेव्हा हृदयविकाराचा झटका आला, तेव्हा ते सुटीवर गावी होते. त्या काळातही अजितदादा त्यांना फोन करून विचारपूस करायचे. ‘अरे विदीप, बरा झालास का? कधी जॉईन होतोयस? तुझी उणीव भासतेय,’ असे दादांचे शब्द विदीप यांच्यासाठी केवळ कामाची दाद नव्हती, तर ते एका कौटुंबीक जिव्हाळ्याचे प्रतीक होते.

विदीप यांचे वडील दिलीपराव जाधव हे मुंबईतील नायगाव हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते सेवानिवृत्त होऊन ते दोन वर्षांपूर्वीच गावी तरडगाव येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि दोन बहिणी असा परिवार आहे. विदीप यांच्या मृत्यूने संपूर्ण तरडगाववर शोककळा पसरली आहे.

वडिलांची भेट झालीच नाही....

विदीप हे सोमवारी प्रजासत्ताक दिनाच्या सुटीला गावी आले होते. त्या वेळी त्यांनी आपले चुलते आणि कटुंबीयांसमवेत वेळ घालवला होता. कामावर जाण्यापूर्वी त्यांनी वडिलांना फोन करून, ‘बारामतीची सभा झाल्यानंतर आज रात्री घरी येतो,’ असे सांगितले होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. विमानात बसण्यापूर्वी अजितदादांसोबत काढलेला तो फोटो शेवटचा ठरेल आणि घराची बेल वाजण्याऐवजी त्यांच्या निधनाची बातमी येईल, असे कोणालाही वाटले नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT