Shahajibapu Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahajibapu : शहाजीबापूंची पुन्हा भीष्मप्रतिज्ञा : 'मी विधान परिषद, राज्यसभा घेणार नाही; ज्याने मला निवडणुकीत पाडलं, त्याला पाडणारच...'

Vidhan Parishad-Rajya Sabha News : माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधान परिषद किंवा राज्यसभा स्वीकारणार नसल्याचे स्पष्ट केले. पुढील विधानसभा निवडणूक ताकदीने लढून आपल्याला पराभूत करणाऱ्याला पराभूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 11 September : मला विधान परिषद, राज्यसभा दिली तरी घेणार नाही आणि मी राजीनामा देऊन टाकीन. कारण मी लढणारा असून निवडून येणार आहे. मला ज्याने निवडणुकीत पाडलं, त्याला पाडणार आहे आणि मग निवांत झोपणार आहे. त्यामुळे मला काही नको, अशा शब्दांत माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभा निवडणूक पुन्हा ताकदीने लढण्याची भीष्मप्रतिज्ञा केली.

आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या शासकीय जयंती सोहळा पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात माजी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार रामराव वडकुते, माजी आमदार संजय जगताप आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, अनेक वक्त्यांनी दौलत शितोळे हे कोणत्याही मतदारसंघात निवडून येतील, असं म्हटलं. निवडून यायचं पुन्हा बघू. निवडणूक काय असते, हे माझ्याएवढं कोणालाही माहिती नाही. अर्ज भरताना प्रत्येकजण निवडून आलेला असतो आणि मतं मोजताना फक्त एकजणच निवडून आलेला असतो.

निवडणुकीत पडायचा अनुभव माझ्याएवढा कोणाला नाही, हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. शिवेंद्रराजे आणि सावेसाहेब तुम्ही दोघं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातील आहात. माझंही मुख्यमंत्र्यांसोबत प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं नातं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळही माझी राजकारणात थोडी पत आहे, असे शहाजीबापूंनी स्पष्ट केले.

माजी आमदार पाटील म्हणाले, राज्यपालांच्या कोट्यातून तुम्हाला (भाजपला) तीन जागा मिळणार आहेत, तर आम्हाला (शिवसेना) आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा वाट्याला येणार आहे. त्या तीन जागांपैकी पहिली जागा दौलत शितोळे यांना द्यावी, अशी माझी मागणी आहे.

ते म्हणाले, निसर्ग नियमाप्रमाणे तुम्ही वरच्या सभागृहात एकदा गेला की, खालच्या सभागृहात आपोआप येऊन बसणारच. त्याची तुम्ही काहीही काळजी करू नका, त्यामुळे तुम्ही पहिलं विधान परिषदेत जा आणि त्यानंतर विधानसभेत या, अशी मागणी मी शिवेंद्रराजे आणि अतुल सावे या दोन मंत्र्यांकडे करतो.

शिवेंद्रराजे वारं वाहायला लागलं की मला सांगा. शिंदे आणि फडणवीससाहेबांचं असं पाय धरतो आणि मला काही मागत नाही. मी फक्त तुमच्यासाठीच मागतो. माझं जे काही पुण्य आहे, ते दौलत शितोळे यांच्यासाठी वापरतो, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

रामोशी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ निर्माण करण्यासाठी दौलत शितोळे यांनी संपूर्ण राज्यात लढा उभारला. त्याचं अध्यक्षपद शितोळे यांच्यासाठी काहींनी मागितलं. पण रामोशी समाज महामंडळाचे अध्यक्षपद दुसरं कोणी घेणार नाही, कारण त्यावर शितोळे यांचाच अधिकार आहे. दुसरं कोणी मागायलाही येणार नाही, असेही शहाजीबापू पाटील यांनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT