Pandharpur, 12 June : महायुतीच्या बैठकीला उपस्थित राहून विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर करणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी अवघ्या काही तासांतच ‘यु टर्न’ घेतला आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतच आहे. माझा विरोध खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना नाही, असेही आमदार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी गुरुवारी (११ जून) भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भटे घेऊन विधान परिषद निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार अभिजीत पाटील यांनी ‘यू टर्न’ घेत मी पक्ष आणि शरद पवार यांच्या सोबत असल्याचे स्पष्ट केले आहे.
आमदार पाटील म्हणाले, माझा विरोध मोहिते पाटील यांना नाही, तर वसंत देशमुख यांना आहे. आज मी आमदार रोहित पवारांच्या (Rohit Pawar) सोबत आहे. मी पक्षाच्या भूमिकेत आहे. मी परवा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात होतो. आज शेतकरी अन्नत्याग आंदोलनात आहे. पक्षाची जी भूमिका आमची आहे, तीच माझी आहे.
पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती निवडीवेळी जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांनी तुतारीचा उमेदवार पाडला. त्यावेळी पक्षाने भूमिका घ्यायला पाहिजे होती. शिक्षा म्हणून त्यांची पक्षातून हकालपट्टी करायला पाहिजे होती. उलट त्यांना तुम्ही विधान परिषदेची उमेदवार देता, हा कुठला न्याय? असा सवालही अभिजीत पाटील यांनी केला.
नगरपालिका निवडणुकीवेळी आम्ही जेव्हा एकत्र आलो, तेव्हा वसंत देशमुखांनी आमच्या विरोधात भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली आणि आज पुन्हा वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी सोईने भूमिका घ्यायची. जो माणूस तीन वेळा भूमिका बदलतो, त्याच्यासाठी आमची भूमिका तपासायचा कोणाला अधिकार आहे, असा सवाल अभिजीत पाटील यांनी केला.
आमदार पाटील म्हणाले, आम्ही पक्षासोबत आहोत, पक्षाच्या माध्यमातून आम्ही सरकारच्या विरोधात लढत राहणार आहोत अधिवेशनात सरकारच्या विरोधात सर्वाधिक प्रश्न विचारणारा मी आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे की, माझ्या मतदारसंघातील आणि महाराष्ट्रातील प्रश्न सुटले पाहिजेत. पण, एखाद्या निवडणुकीत एखादा उमेदवार चुकला तर त्याला विरोध दर्शविण्याची आमची भूमिका आहे.
जर पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणत असतील की, वसंतराव देशमुख भाजप सोबत आहेत तर त्यांची निष्ठा तपासा. ज्यांची निष्ठा ऊतू चालली आहे ना, त्यांना याबाबत विचारा. मग आम्हाला आता काय प्रश्न विचारण्याचे कारण आहे, असा प्रश्न आमदार अभिजीत पाटील यांनी उपस्थित केला.
आमदार अभिजीत पाटील यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत असल्याचे म्हटले असले तरी विधान परिषद निवडणुकीत त्यांनी पक्षाच्या उमेदवारांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.