Pune News : आपल्या कडक आणि शिस्तप्रिय कार्यपद्धतीसाठी प्रसिद्ध असलेले धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळयुक्त आणि अवैध व्यवसाय करणाऱ्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे.
राज्याच्या विविध शहरांनंतर आता एफडीएच्या या धडक कारवाईचे सत्र पुण्यातही पोहोचले असून, शनिवारी मुंढे यांच्या पथकाने पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानक परिसरात मोठी कारवाई केली. यामुळे नियमबाह्य काम करणाऱ्या आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखालील विशेष पथक सायंकाळी ५ ते ५:३० च्या सुमारास स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. तिथून पोलीस बंदोबस्तासह या पथकाने स्वारगेट बस स्थानक आणि त्याभोवती असलेल्या सर्व हॉटेल्स, टपऱ्या आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवर अचानक छापे टाकले. एफडीएच्या या अनपेक्षित कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश
कारवाईदरम्यान पथकाने विविध दुकानांमध्ये जाऊन अन्नपदार्थांचा दर्जा, साठवणूक आणि स्वच्छतेची कसून पाहणी केली. ज्या दुकानांमध्ये अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले, त्यांना प्रशासनाने कडक शब्दांत सुनावले.
तसेच पथकाने अनेक दुकाने खाली करून घेतली आणि, "जोपर्यंत संपूर्ण परिसराची आणि दुकानाची व्यवस्थित स्वच्छता केली जात नाही, तोपर्यंत दुकाने बंद ठेवावीत," असे कडक आदेश दुकानदारांना देण्यात आले आहेत.
विक्रेत्यांचे धाबे दणाणले
तुकाराम मुंढे यांनी एफडीएमध्ये आल्यापासून अवैध व्यवसाय करणारे आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंढे यांच्या टीमने घेतलेल्या या धसक्यामुळे स्वारगेट परिसरासह पुण्यातील इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.