Kolhapur News, 10 Aug : गत स्थायी समिती सभेमध्ये कचरा संकलनाच्या २२ कोटींच्या अंदाजपत्रक मंजुरीच्या वादातूनच आवाडे-हळवणकर गटातील वादाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर आता पुन्हा स्थायी समितीची सभेच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळणार अशी चर्चा होती. तत्पूर्वी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासोबत बैठक घेत या वादाला पूर्णविराम देण्याची बोलणी केली होती.
शिवाय आपल्या तक्रारीचा पाढा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू अशी ग्वाही दिली होती. अखेर आज स्थायी समिती सभापतीच्या बैठकीत आवाडे-हळवनकर गटाच्या नगरसेवकांनी गळ्यात गळे घालून एन्ट्री केल्याने मंत्री चंद्रकांत पाटील यांची मात्रा कामी आली. माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी रविवारी बैठक घेत नगरसेवकांना चार महिने सबुरी घेण्याचा सल्ला दिला. आज स्थायी समितीच्या बैठकीत चक्क चमत्कार झाला. हळवणकर आणि आवाडे गटाच्या नगरसेवकांनी एकत्र येत सर्व विषय मंजूर केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
रविवारी आवाडे व हळवणकर यांच्या गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार हळवणकर यांनी बैठक घेत नगरसेवकांसोबत चर्चा केली. महापालिकेतील महापौर आणि स्थायी सभापती पदे पुढील काळात आपल्याकडे येणार आहेत, त्यामुळे आणखी काही महिने सबुरीने घ्या, असा सल्ला माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी आपल्या गटातील नगरसेवकांना दिला होता. त्यांच्या कार्यालयात बैठक झाली. यापुढे दोन्ही गटांतील वाद टाळण्यासाठी सात जणांची समन्वय समिती कार्यरत असेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. काही दिवसांपासून सुरू असलेल्या दोन्ही गटांतील वादात हाळवणकर गटाने तूर्त तरी तडजोडीची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे.
आवाडे गटाकडून हळवणकर गटाला विश्वासात घेत नसल्याच्या तक्रारी बहुतांश नगरसेवकांनी हळवणकर यांच्याकडे केल्या. २२ कोटी रुपये खर्चाची स्वच्छतेच्या कामाची निविदा आवाडे गटाकडून परस्पर काढली. त्यावर यावेळी चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेल्या चर्चेचा आढावा सांगत हळवणकर यांनी यापुढे महापालिकेचे कामकाज करताना दोन्ही गटांत समन्वय ठेवण्याच्या सूचना दिल्याचे नमूद केले.
दरम्यान, दोन्ही गटाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आज होणारी स्थायी समिती बैठक वादाची होण्याची शक्यता वर्तवली जात होती. सभे समोरील विषयांमुळे पुन्हा एकदा हळवणकर व आवाडे गटात जुंपणार अशी चर्चा होती. रिंग रोड काँक्रिट करण्याच्या कामाबाबत ठेकेदाराला मुदतवाढ देण्याविषयी आहेत. यापूर्वी सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत होती. ही मुदत नुकतीच संपली आहे; पण तीनपैकी केवळ एकच टप्पा पूर्ण झाला आहे. अद्याप दोन टप्प्यांचे काम अपूर्ण आहे. या रस्त्याच्या रखडलेल्या कामाबाबत हळवणकर गटाचे नगरसेवक महासभेत आक्रमक झाले होते.
आता या कामाच्या ठेकेदाराला मुदतवाढ देण्याचा विषय सभेसमोर होता. त्याला विरोधकांकडून जोरदार आक्षेप घेतला जाण्याची शक्यता होती, शिवाय हळवणकर गटाच्या भूमिकेकडे विशेष लक्ष होते. हळवणकर गट व विरोधक एकत्र आल्यास या विषयाची मंजुरी लांबणीवर पडण्याचा धोका होता. पण, आज बैठकीत आवाडे-हळवणकर गटाचे नगरसेवक गळ्यात गळे घालून बैठकीला आल्याने सर्व विषय मंजूर करण्यात आले.
चंद्रकांत पाटलांची मध्यस्थी
दरम्यान इचलकरंजी महानगरपालिकेत माजी आमदार हळवणकर आणि आमदार राहुल आवाडे यांच्या गटातील नगरसेवकांमध्ये २२ कोटीच्या कचरा संकल्पना वरून वादाची ठिणगी पेटली होती. मात्र भाजपमधील अंतर्गत वाद कमी करण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवावा अशी विनंती केली होती. भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू अशी ग्वाही चंद्रकांत पाटील यांनी हळवणकर यांना दिली होती. या चर्चेनंतर हळवणकर यांनी बैठक घेत नगरसेवकांना सबुरीचा सल्ला दिला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.