Ichalkaranji Municipal Corporation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ichalkaranji: महापालिका आयुक्तांच्या बदलीसाठी भाजपच्या माजी आमदाराची फिल्डिंग : CM फडणवीसांकडे शब्द टाकण्याची तयारी

Ichalkaranji Municipal Corporation, Halvankar Group, Suresh Halvankar: इचलकरंजी महापालिकेतील २२ कोटी स्वच्छता कामाच्या अंदाजपत्रकासह आयुक्तांच्या वागणुकीवर हाळवणकर गटाने माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी चर्चा केली. विशेष सभेतील भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Ichalkaranji Municipal Corporation: मागील आठवड्याभरापासून इचलकरंजी महापालिकेतील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील हाळवणकर गटाच्या नगरसेवकांनी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भेट घेऊन चर्चा केली. स्वच्छता कामाच्या २२ कोटी अंदाजपत्रकावर सोमवारी (ता.२७) होणाऱ्या विशेष सभेत कोणता निर्णय घ्यायचा आणि आयुक्तांकडून नगरसेविकांना मिळणारी अवमानकारक वागणूक असे दोन विषय चर्चेच्या केंद्रस्थानी होते. या दोन्ही विषयांवर निर्णय घेण्याची मोकळीक हाळवणकर यांनी नगरसेवकांना दिली आहे. त्यामुळे महापालिका राजकारणात हाळवणकर गटाच्या पुढील भूमिकेला महत्त्व आले आहे.

इचलकरंजी महापालिकेत आयुक्त विरुध्द नगरसेविका यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. आयुक्तांकडून योग्य सन्मान मिळत नसल्याची बहुतांशी नगरसेवक-नगरसेविकांची तक्रार आहे. त्याचा उद्रेक चारच दिवसांपूर्वी झाला होता. हाळवणकर गटाच्या नगरसेवक- नगरसेविकांनी थेट महापौर उदय धातुंडे यांच्याकडे याबाबतची तक्रार केली होती. त्यानंतर आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. पण, त्यावर बहुतांशी नगरसेवकांचे समाधान झाले नाही. त्यांनी आज माजी आमदार हाळवणकर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन महापालिकेतील कामकाजाबाबत तक्रारी केल्या.

सोमवारी (ता.२७) होणाऱ्या विशेष सभेत काय निर्णय घ्यायचा, अशी विचारणा त्यांच्याकडे केली. तसेच आयुक्तांची बदली करण्याची आग्रही मागणी केली. प्रत्येक नगरसेवक त्याच्या प्रभागातील नागरिकांचे प्रतिनिधीत्व करीत असतो. त्यामुळे तुम्हाला योग्य वाटेल, तो निर्णय घ्या, असा सल्ला त्यांनी नगरसेवकांना दिला आहे, तर आयुक्त बदलीचा मुद्दा त्यांनी गांभीर्याने घेतला आहे.

याबाबत नगरसेवकांनी तक्रारी दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बदलीबाबत पाठपुरावा करण्यात येईल, असा शब्द त्यांनी नगरसेवकांना दिला आहे. त्यामुळे उद्या (ता.२७) सकाळी होणाऱ्या हाळवणकर गटाच्या नगरसेवकांच्या बैठकीत या दोन्ही विषयांवर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचा वाद मिटविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत यंत्रणा सक्रिय झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT