Ichalkaranji Municipal Corporation : माजी आमदार सुरेश हळवणकर आणि आमदार राहुल आवाडे यांच्यातच इचलकरंजी महापालिकेतील महापौर निवडणुकीत बिग फाईट सुरू आहे. इचलकरंजी महानगरपालिकेत भाजपने एकहाती सत्ता मिळवल्यानंतर अंतर्गत गटबाजीमुळे महापौरपदासाठी सुचित केलेल्या नावावर एकमत होत नसल्याने पुन्हा एकदा पेच निर्माण झाला आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत इचलकरंजी संदर्भात सांगलीत बैठक होणार आहे. आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची यावेळी उपस्थिती असणार आहे. या बैठकीतच एकाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यावरही समाधान न झाल्यास थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच कोर्टात चेंडू ढकलला जाणार आहे.
भाजपमधील आवाडे गटाकडून नीतेश पोवार आणि उदय धातुंडे या दोन नावांची जोरदार चर्चा आहे. तर हाळवणकर गटाकडून तानाजी पोवार व प्रदीप धुत्रे यांची नावे पुढे आली आहेत. या बैठकीत जर नावावर एकमत न झाल्यास तीन नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत.
दोन्ही गटांतील इच्छुकांनी केलेली जोरदार मोर्चेबांधणी आणि त्यावरून निर्माण झालेला पेच यामुळे ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. असे झाल्यास ऐनवेळी चर्चेतील नावे मागे पडण्याचीही शक्यता आहे. त्यानंतर चर्चेत नसलेल्या चेहऱ्यावर एकमत होण्याचीही शक्यता आहे. नवीन चेहऱ्याला संधी देत सर्वांनाच धक्का देण्याची तयारी प्रमुख नेतेमंडळींनी केली असल्याचीही चर्चा सुरू आहे. विशेषतः कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे पहिल्या महापौर महिला होऊ शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
हाळवणकर गटाकडून माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्या नावाची आज समाज माध्यमातून जोरदार चर्चा होती. वस्त्रनगरीच्या राजकारणातील जाणकार अशी त्यांची ओळख आहे. दांडगा राजकीय अनुभव व प्रशासकीय पकड या दोन्ही त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर प्रदीप धुत्रे यांच्या नावालाही पसंती वाढत चालली आहे. माजी आमदार हाळवणकर यांचे कट्टर समर्थक, अशी त्यांची ओळख आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.