Markadwadi Ballot Paper Voting : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी या गावाची सध्या राज्यासह देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. कारण या गावातील ग्रामस्थांनी थेट प्रशासनाच्या विरोधात जात बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार मंगळवारी (ता.3 डिसेंबर) रोजी गावात बॅलेट पेपरवर (Ballot Paper Voting) मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. सकाळी 8 ते 4 या वेळेत ही मतदानाची प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर यानंतर लगेचंच मतमोजणी केली जाणार आहे. मात्र, या मतदान प्रक्रियेवर प्रशासनाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
त्यामुळे या पार्श्वभूमीवर 5 डिसेंबर पर्यंत जमावबंदीचे आदेश देखील लागू करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाशिवाय इतर कोणतीही यंत्रणा अशा पद्धतीने मतदान घेऊ शकत नाही असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे मंगळवारी मतदानाची (Voting) प्रक्रिया राबल्यास त्या नागरिकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
शिवाय ही प्रक्रिया बेकायदेशीर असल्याची नोटीस देत जवळपास 20 पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे. तरीही गावकरी मतदानावर ठाम असून 'बॅलेटसाठी बुलेट झेलू' असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आज या गावात मतदान प्रक्रिया कशी पार पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (Sharad Pawar) नवनिर्वाचित आमदार उत्तम जानकर यांच्यापेक्षा मारकरवाडीत विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांना 160 मतांची आघाडी मिळाली आहे. मात्र, या गावात आपलं वर्चस्व असून आपल्याला मानणारे लोक या गावात आहेत.
त्यामुळे सातपुतेंना आघाडी मिळणं अशक्य असून मतमोजणी प्रक्रियेत काहीतरी घोळ केल्याचा संशय जानकर यांनी घेतला आहे. त्यामुळे इथे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. दरम्यान, गावाने एकत्र येऊन त्यांच्या खर्चाने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यावर शासनाला आक्षेप घेण्याचे कारण काय? असा सवाल उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी केला आहे. त्याशिवाय मारकडवाडीत मतदान पार पडणारच असंही जानकर यांनी म्हटलं आहे. तसंच प्रशासनाने दबावात येऊन अंतरवाली सराटीप्रमाणे आमच्यावर लाठी हल्ला केला किंवा गोळ्या जरी झाडल्या तरीही गावात मतदान घेणार, अशी भूमिका जानकर यांनी घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.