
Mumbai News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असताना देखील सत्तास्थापन करीत असताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महायुतीतील मित्र पक्षांमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे. याच दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी गावी गेल्याने उलट-सुलट चर्चा सुरू होत्या. दरे गावावरून परतल्यानंतर सीएम शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याचे समजल्यानंतर सोमवारी रात्री भाजपचे संकटमोचक म्हणून ख्याती असलेले ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी सीएम शिंदेंच्या ठाण्यातील घरी जाऊन चर्चा केली.
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेऊन चर्चा केली असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नसल्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. त्यांच्यासोबत तासभर चर्चा केली. महायुतीमध्ये सगळे काही आलबेल आहे. आमच्यात कसलेच मतभेद नाहीत, असे स्पष्टीकरण महाजन यांनी भेटीनंतर प्रसार माध्यमाशी बोलताना दिले.
राज्यात सध्या महायुतीच्या सत्तास्थापनेवरून हालचालींना प्रचंड वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. शिंदेच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो, असे महाजन यांनी सांगितले. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे यांना सलाईन लावण्यात आले असून त्यांची तब्येत ठीक असल्याचे त्यांनी सांगितले.
सीएम शिंदे यांची तब्येत गेल्या दोन दिवसांपासून बरं नसल्याची माहिती आहे. ते दोन दिवस त्यांच्या साताऱ्यातील दरेगावात मुक्कामी होते. तिथे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतले. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले होते. पण त्यांची पुन्हा प्रकृती खालावल्याने त्यांची शिवसेना नेत्यांसोबतची सोमवारची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींदरम्यान गेल्या दोन-तीन दिवसात एकाही भाजप नेत्याने शिंदेंची भेट घेतली नव्हती. यानंतर गिरीश महाजन यांनी भेट घेतल्याने महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करुन तब्येतीची विचारपूस केल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आरामाचा सल्ला दिला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन यांच्या भेटीत काही राजकीय विषयांवर चर्चा झाली असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी गिरीश महाजन यांनी सोमवारी दुपारीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यामुळे गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत राजकीय चर्चेची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.