Madan Bhosale, Makrand Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

हिंमत असेल तर कुटुंबाच्या संपत्तीची अदलाबदल करा...मदन भोसलेंचे मकरंद पाटलांना आव्हान

किसन वीर कारखाना Kisan veer Sugar factory हा कोणाच्या खासगी मालकीचा Private Property नाही तो शेतकर्‍यांच्या मालकीचा Farmers Property आहे आणि त्यामुळेच अन्य दुसर्‍या कारखान्याला ऊस घालणार नाही ही भूमिका आम्ही तेव्हाही जपली.

Umesh Bambare-Patil

सातारा : ज्यावेळी शक्य होतं त्यावेळी शेतकर्‍यांना जादा देण्याचा प्रयत्न केला. त्यातून एसएमपी आणि नंतर एफआरपीपेक्षा 400 कोटी रुपये शेतकर्‍यांना त्यांच्या हक्काचे दिले. ते पैसे स्वत:च्या मांडीखाली दाबले नाहीत. आता अडचणी असल्या तरी त्या दूर करण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते ते करतो आहे. या अडचणींचे निर्मिक असणारे स्वत:चे आडवे जाण्याचे पाप झाकण्यासाठी भ्रष्टाचाराचा आरोप करत आहेत. असं जर असेल आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या संपत्तीची अदलाबदली करा, असे आव्हान मदन भोसले यांनी विरोधकांना दिले.

मर्ढे (ता. सातारा) येथे शेतकरी विकास पॅनेलच्या प्रचारासाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मानसिंगराव शिंगटे, मर्ढेचे सरपंच शरद शिंगटे, सोसायटीचे चेअरमन सुधाकर शिंगटे उमेदवार रतनसिंह शिंदे, दिलीप शिंदे, पै. जयवंत पवार उपस्थित होते. मदन भोसले म्हणाले, शेतकर्‍यांच्या हितासाठीच प्रकल्प उभारले. ते करताना काही अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत. त्याचा ताण आला. त्यातून सावरण्यासाठी जिद्द पणाला लावली. त्यासाठी पवार साहेबांचीही अनेकदा भेट घेतली. विरोधकांसारखं स्वत:ला काही मागायला गेलो नव्हतो. कारखान्याचे मालक असलेल्या शेतकर्‍यांसाठी कसलाही इगो न दाखवता जेथे जेथे जावं लागेल तिथे तिथे गेलो.

राज्य सहकारी बँक 125 कोटी रुपये देण्यासाठी तयारही होती. प्रत्येक कारखाना दरवर्षी पैसे उभे करुनच चालवला जातो. आज उद्या करता करता अचानक एक दिवस बँकेने पैसे देण्यास नकार दिला. हा नकार आपल्या विरोधकांच्या आडवे जाण्यामुळेच मिळाला हे सत्य आहे. त्यानंतर इतर ठिकाणी प्रयत्न केले तर तिथे प्रत्येक ठिकाणी आडवे जाणारे हेच. आता केंद्र सरकारच्या सहकार विभागाकडून मदत मिळण्याचा मार्ग असताना तिथूनही मदत मिळणार नाही, असे हेच सांगत आहेत.

एक गोष्टच यांची कळत नाही. केंद्र सरकारने, राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या कारखान्याला मदत करावी अशी भावना हे का ठेवत नाहीत? शेतकर्‍यांच्या अन्नात माती कालवण्यापेक्षा ही संस्था शेतकर्‍यांच्या मालकीची आहे ती सुरळीत रहावी असे यांना का वाटत नाही? संचालक मंडळ कोण यापेक्षा कारखान्याचे मालक हे शेतकरी आहेत हे यांच्या लक्षात का येत नाही? यापूर्वी स्व. तात्या चेअरमन होते तेव्हा आम्ही संघर्ष करत होतो. पण तेव्हा आम्हीच काय पण पण आमच्यापैकी कुणीही इतर कोणत्या कारखान्याला ऊस घातल्याचे एक उदाहरण दाखवा.

कारखाना हा कोणाच्या खासगी मालकीचा नाही तो शेतकर्‍यांच्या मालकीचा आहे आणि त्यामुळेच अन्य दुसर्‍या कारखान्याला ऊस घालणार नाही ही भूमिका आम्ही तेव्हाही जपली. अशा व्यापक भूमिकेचा लवलेशही ज्यांच्या मनी नाही त्यांनी शेतकर्‍यांचा कळवळा आणणे हास्यास्पद आहे. कारखान्यासमोर अडचणी आहेत आणि त्या दूर करण्याची जबाबदारीही माझीच आहे. त्या जबाबदारीपासून पळ काढला नाही. धाडसाने त्याला सामोरा जात आहे. जिद्दीने पाय रोवून उभा आहे.

या प्रसंगातून बाहेर पडून शेतकरी, कामगारांना त्यांच्या हक्काचं दिल्याशिवाय राहणार तर नाहीच शिवाय शेतकर्‍यांची कारखान्यावरील मालकी टिकवण्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी मागे हटणार नाही, असेही त्यांनी ठणकावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT