Pankaja Munde Sugar Factory Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pankaja Munde Sugar Factory : पंकजा मुंडेंच्या संकटात 'मावशी' पाठीशी खंबीरपणे उभी राहणार...

Pankaja Munde Vaidhnath Sugar Factory News : अनेकांनी केली आर्थिक मदतीची घोषणा ...

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर 19 कोटींचा कर न भरल्याने, जीएसटी विभागाने नोटीस बजावत कारवाईचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंडे परिवाराची 'मावशी' असे संबोधल्या जाणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील मुंडे समर्थक सरसावले असून, अनेकांनी ताईंच्या कारखान्यावर आलेल्या आर्थिक संकटात आर्थिक मदतीचा हात उत्स्फूर्तपणे पुढे केला आहे. (Latest Marathi News)

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी परळीला आई, तर पाथर्डीला मावशी संबोधले. भगवानबाबा गडावर दसरा मेळावा असो की, इतर कोणतेही कार्यक्रम असो, वंजारीबहुल पाथर्डी तालुक्याने साहेबांवर निस्सीम प्रेम केले. आजही पंकजा मुंडे यांनाच मानणारा तालुक्यात मोठा वर्ग आहे. त्यामुळे पंकजा यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर आर्थिक संकट आलेले असताना पाथर्डी तालुक्यातील अनेक जण आर्थिक मदतीच्या रकमांची घोषणा समाजमाध्यमातून करत आहेत.

आम्ही ताईंच्या आदेशाची वाट पाहात आहोत, लागेल ती मदत आम्ही करू, असे मुंडे समर्थक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी म्हटले आहे, तर पाथर्डी पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीता दौंड यांनी दसरा मेळाव्यात पाच लाख रोख ताईंकडे सुपूर्त करणार अशी घोषणा केली आहे. पाथर्डी तालुक्यातील अनेक मुंडे समर्थक समाजमाध्यमातून विविध रकमांचे चेक 'गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान'च्या नावाने पोस्ट करत पाठिंबा देत आहेत.

जीएसटी विभागाने नोटीस नव्हे तर कारवाईच केली असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट करत इतर अनेक कारखान्यांना मदतीचा हात दिला गेला असताना वैद्यनाथ साखर कारखान्याला जीएसटी विभागाने नोटीस बजावली असल्याची खंत पंकजा मुंडे यांनी माध्यमातून मांडली आहे. 'मी रोज बँकांना मदतीसाठी आर्जव करतेय, मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि माझे वजन 9 किलोने कमी झाले आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर 19 कोटीच काय त्याच्या दुप्पट रक्कम आम्ही नोटीस देणाऱ्यांच्या तोंडावर फेकून मारू, असे समर्थक म्हणत आहेत. पंकजाताईंच्या आदेशाची आम्ही वाट पाहात आहोत, ताईंना एकटे पडू देणार नाही, अशी भावनिक साद कार्यकर्त्यांतून पुढे येत आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

SCROLL FOR NEXT