Satara, 20 July : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे निवडणुकीचे पडघम जोरजोरात वाजू लागले आहेत. सध्या विविध कार्यकारी सोसाट्यांमध्ये ठराव घेण्याची घाई सुरू आहे. मात्र, जुने हिशेब चुकते करण्याचा प्रयत्न जिल्हा बॅंक निवडणुकीच्या माध्यमातून होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्येच दोन गट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे महायुतीमधील नेत्यांना सोबत घेऊन पॅनेल उभारण्याची चर्चा आहे.
आगामी निवडणुकीत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी रणनीती पक्षाकडून आखली जात आहे. पण भाजपमध्येच दोन गट होऊ लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. साताऱ्यात पक्षाचे दोन मंत्री आणि दोन आमदार आहेत, तसेच मागील काळात बहुमत हाताशी नसतानाही भाजपने जिल्हा परिषदेत सत्ता मिळवली आहे. झेडपीला एकत्र दिसणारी भाजप आता तेवढी एकसंघ दिसत नाही
भाजपत मानसन्मान आणि नेतृत्वाच्या मुद्यावरून अंतर्गत नाराजी मोठ्या प्रमाणात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत नेमके नेतृत्व शिवेंद्रराजे करणार की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे करणार, यावर पुढची राजकीय गणिते अवलंबून आहेत. हे दोन्ही मंत्री आपल्याच विचारांचे संचालक बॅंकेत निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. त्यातूनच संघर्ष उफाळण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
ग्रामविकास मंंत्री जयकुमार गोरे यांना वगळून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे महायुतीमधील शिवसेना नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, अनिल देसाई, उदयसिंह पाटील उंडाळकर, सुनील खत्री यांच्यासह विविध सहकारी सोसाट्यांचे संचालक एकत्र येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दुसरीकडे, भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यातही नेतृत्वाचा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमध्ये महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण मागील १५ वर्षांपासून उपमुख्यमंत्री (स्व.) अजित पवार यांना मानणाऱ्या संचालकांचे बॅंकेवर वर्चस्व आहे. सध्याही सहकारातील बहुतांश नेते हे दोन्ही राष्ट्रवादीचे नेतृत्व मानणारे आहेत.
शिवसेनेची ताकद मर्यादीत असली तरी सध्या साताऱ्यातील शिवसेना नेत्यांचे भाजपपेक्षा राष्ट्रवादीसोबत मधुर संबंध आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील पराभवाचे उट्टे काढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे महत्व वाढण्याची शक्यता आहे. ते स्वतंत्र पॅनेल टाकू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.