Solapur Dcc Bank Election Voting Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Dcc Bank Voting : डीसीसी बॅंकेच्या मतदानात डाव्या अंगठ्यापासून करंगळीपर्यंत शाई लावणार; एकापेक्षा अधिक मतदानासाठी निर्णय

Voting Ink News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांत मतदान करणाऱ्या मतदारांसाठी विशेष शाईची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रत्येक मतदारसंघासाठी डाव्या हाताच्या वेगवेगळ्या बोटावर शाई लावली जाणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

Solapur, 22 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीत अनेकांचा एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदार प्रतिनिधी म्हणून ठराव झालेला आहे. त्यामुळे काही मतदारांना एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदानाचा हक्क बजवावा लागणार आहे. त्या मतदाराने मतदान केले की नाही? हे समजण्यासाठी मतदानाची शाई डाव्या हाताच्या अंगठ्यापासून लावण्यास सुरुवात केली जाणार आहे. प्रत्येक मतदारसंघातील मतदानाची शाई डाव्या हाताच्या वेगवेगळ्या बोटावर लावली जाणार आहे.

जिल्हा बँकेच्या संचालकासाठी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील ११, राखीवच्या पाच जागा (महिला दोन, एससी/एसटीची एक, ओबीसीची एक, भटक्या/विमुक्तची एक), पणन व प्रक्रियाची एक जागा, दुग्ध संस्थेची एक जागा व नागरी बँकांची एक जागा अशा १९ जागा आहेत.

यामधील माळशिरस आणि सांगोला वगळता इतर तालुक्यातील सोसायटी मतदारसंघ बिनविरोध झाले आहेत. राखीवमधील ओबीसी मतदारसंघाची निवड बिनविरोध झाली आहे. बँकेच्या १९ पैकी १० जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता उर्वरीत ९ जागांसाठी निवडणूक होत आहे.

सोसायटीमधील माळशिरस व सांगोला, राखीवमधील चार आणि पणन, दुग्ध व नागरी बँक अशा एकूण ९ जागांसाठी गुरुवारी (ता. २६) सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार आहे. मतदानासाठी प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे ११ मतदान केंद्र निश्‍चित करण्यात आले आहेत.

बँकेसाठी पात्र ठरलेल्या २५९६ मतदारांमध्ये बहुतांश जणांचे सोसायटी, पणन, नागरी बँका व दुग्ध या चारही मतदारसंघात मतदान आहे. त्यामुळे मतदानाची शाई लावताना डाव्या हाताच्या अंगठ्यापासून सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर तर्जनी (अंगठ्याशेजारील), मध्यमा, अनामिका आणि करंगळी या बोटावर शाई लावली जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार यांनी दिली आहे.

मतदानाचा हक्क बजाविला की नाही? हे समजणार

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत काही मतदारांचे मतदान एकापेक्षा अधिक मतदारसंघात आहे. त्याने मतदानाचा हक्क बजाविला आहे की नाही? हे समजण्यासाठी डाव्या हाताच्या अंगठ्यापासून शाई लावण्यास सुरुवात केली जाणार आहे. निवडणुकीच्या नियोजनासंदर्भात लवकरच आम्ही बैठक घेत आहोत, त्यात मनुष्यबळ व इतर बाबी निश्‍चित होतील, असे डीसीसी बॅंकेचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी सांगितले.

आकडेवारी

एकूण जागा : १९

बिनविरोध झालेल्या जागा : १०

मतदान होणाऱ्या जागा : ९

निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार : २४

पात्र मतदारांची संख्या : २५९६

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT