Shivsena UBT Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shivsena UBT : सोलापुरात ठाकरेंची शिवसेना खिळखिळी; दोन जिल्हाप्रमुख, युवा-युवती सेना जिल्हा अन्‌ शहरप्रमुखांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Corporation Election 2026 : सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपच्या राजकारणामुळे मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले असून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 01 January : सोलापूर महापालिका निवडणुकीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. एबी फार्म देण्यापासून उमेदवारांची पळवापळवीपर्यंत अनेक प्रकार या निवडणुकीत आतापर्यंत पहायला मिळाले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या साम-दाम-दंड भेदाच्या राजकारणाचा अनेक पक्षांना विशेषतः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा फटका बसला आहे. महापालिका निवडणुकीत संपर्कप्रमुख, दोन जिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, युवती सेना जिल्हाप्रमुख, युवा सेना शहरप्रमुख, विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख यांनी ठाकरेंची साथ सोडली आहे.

सोलापूर (Solapur) महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवत आहे. यात ठाकरे सेनेला ३० जागा मिळाल्या होत्या. त्यादृष्टीने ठाकरे सेनेने निवडणूक रणनीती बनवली होती. मात्र, भाजपच्या आक्रमक राजकारणाचा शिवसेनेला मोठा फटका बसला आहे. नगरपालिका निवडणुकीत बसलेला फटका पाहून भाजपने मजबूत नेत्यांना मैदानात उतरवले आहे.

सोलापूर महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या (Thackeray) आठ प्रमुख शिलेदारांनी पक्ष सोडला आहे. त्यामागे भाजच्या आक्रमक राजकीय रणनीतीचा भाग आहे. ठाकरेंची साथ सोडलेल्या आठ नेत्यांमध्ये मातब्बरांचा समावेश आहे, यात संपर्कप्रमुख, दोन जिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, युवती सेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, युवा सेना जिल्हाप्रमुख, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख यांचा समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या पक्षसंघटनेची जबाबदारी ज्यांच्यावर देण्यात आली होती, ते संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनीच पक्षाला जय महाराष्ट्र केला आहे. कोकीळ यांनी मुंबईत तिकिट मागितल्याची चर्चा आहे. पण पक्षाकडून तिकिट न मिळाल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचे सांगितले जात आहे. कोकीळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

ठाकरेंची एकनिष्ठ म्हणून ओळख राहिलेले वानकर यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या जिल्हाप्रमुख गणेश वानकर, युवा सेनेचे शहरप्रमुख विठ्ठल वानकर, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रेय वानकर यांनीही ठाकरेंची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. ठाकरेंनी वानकर यांना शिवसेनेकडून लढण्यासाठी पक्षाचा एबी फॉर्मही दिला होता. मात्र, तो नाकारून वानकर यांनी भाजपच्या तिकिटावर लढणे पसंत केले आहे.

दुसरे जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांनीही ऐन निवडणुकीत पक्षाचा राजीनामा दिला आहे. संतोष पाटील यांच्या पत्नीला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने निवडून येऊ शकणाऱ्या ठाकरे सेनेतील पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्यात बऱ्यापैकी यश मिळविले आहे. पण ठाकरे सेनेचे सर्व म्होरके आपल्या पक्षात ओढले आहेत.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रमुख पुरुषोत्तम बरडे यांची कन्या उत्तरा बरडे-बचुटे यांना प्रभाग क्रमांक सातमधून भाजपने तिकिट दिले आहे. निवडणुकीपूर्वीपासून बरडे आणि जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्यातील वाद वाढला होता. त्यात आता दासरींच्या हाती आयते काेलित पडले आहे.

याशिवाय युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले, युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख पूजा खंदारे यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. या दोघांनाही शिंदेसेनेकडून तिकिट देण्यात आलेले आहे. याशिवाय विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख लहू गायकवाड यांनीही पक्ष सोडला आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीत ठाकरेंची सेनेत मोठी पडझड झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT