Income Tax Raid
Income Tax Raid  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

सोलापुरात बांधकाम व्यावसायिक, साखर सम्राटांसह आठ ठिकाणी छापेमारी

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर (Solapur) जिल्ह्यात आज (ता. २५ ऑगस्ट) पहाटेपासून प्राप्तीकर विभागाच्या पथकांकडून (Income Tax ) छापेमारी करण्यात आली. जिल्ह्यातील साखर उद्योजक अभिजित पाटील यांच्याशी संबंधित साखर कारखाने आणि कार्यालयांचाही समावेश आहे. तसेच, शहरातील प्रसिद्ध व्यावसायिक, रुग्णालयांचीही चौकशी करण्यात येत आहे. प्राप्तीकर विभागाच्या वतीने या संदर्भात अद्याप तरी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, सोलापूर शहरासह जिल्ह्यात जवळपास आठ ठिकाणी प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी कागदपत्रांची तपासणी करत असल्याची माहिती आहे. (Income Tax Department conducted raids at eight places in Solapur district)

सोलापूरातील प्रसिद्ध व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्सट्रक्शन या ठिकाणी सकाळपासून झडती घेण्यात येत आहे. प्राप्तीकर विभागाच्या पुणे येथील पथकाच्या माध्यमातून मेहूल कन्स्ट्रक्शनच्या कागदपत्रांची तपासणी करत आहेत. सोबतच बिपीनभाई पटेल संचालक असलेल्या सोलापूर शहरातील आश्विनी हॉस्पीटल आणि कुंभारी परिसरात असलेले आश्विनी हॉस्पीटल आणि मेडिकल कॉलेज या ठिकाणीही प्राप्तीकर विभागाचे पथक कागदपत्रांची तपासणी करत आहे.

प्राप्तीकर विभागाचे वरीष्ठ अधिकारी बिपीनभाई पटेल यांच्या सोलापुरातील घरी ठाण मांडून बसले आहेत. सकाळपासून पटेल यांच्याशी संबंधित असलेल्या सर्व कार्यालयांची चौकशी सुरु असल्याने एकच खळबळ उडाली आहे. मात्र, यासंदर्भात प्राप्तीकर विभाग किंवा पटेल यांच्या वतीने कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सोलापुरातील काही वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळीही प्राप्तीकर विभागाच्या रडारवर आहेत.

सोलापुरातील सात रस्ता परिसरात असलेल्या डॉ. गुरुनाथ परळे यांच्या स्पंदन हार्ट क्लिनिक याठिकाणी प्राप्तीकर विभागाचे अधिकारी तपासणी करत आहेत. या संदर्भात डॉ. गुरुनाथ परळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी 'मला या संदर्भात पूर्ण माहिती नाही. मात्र, प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आल्याचे समजले. मी सध्या सोलापुरात नाही,' अशी प्रतिक्रिया डॉ. परळे यांनी दिली. तसेच, सोलापुरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अनुपम शहा यांच्या हॉस्पीटलवरही छापा टाकण्यात आला आहे. सकाळपासून प्राप्तीकर विभागाचे पथक या ठिकाणी तपासणी करत आहेत. शहरातील डॉ. विजयकुमार राघोजी यांच्या राघोजी किडनी आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही सकाळपासून प्राप्तीकर विभागाची तपासणी मोहीम सुरु आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रातील विविध भागात सुरु असलेल्या धाडसत्रांमध्ये सहभागी अधिकाऱ्यांच्या वाहनांवर कृषी अभ्यास शिबिराचे पोस्टर लावण्यात आले होते. सुत्रांच्या माहितीनुसार जवळपास २४ पथकांद्वारे विविध ठिकाणी या कारवाया सुरु आहेत. यामध्ये ५० गाड्या आणि शंभरहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT