Rahul Jagtap, NCP
Rahul Jagtap, NCP Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राहुल जगतापांच्या शिष्टाईने राष्ट्रवादीत इन्कमिंग

संजय आ. काटे

श्रीगोंदे ( जि. अहमदनगर ) - श्रीगोंद्यात भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते ( Babanrao Pachpute ) आमदार आहेत. मात्र त्यांना अगदी थोड्या फरकाने विजय मिळविता आला होता. माजी आमदार राहुल जगताप ( Rahul Jagtap ) यांनी विधानसभा निवडणूक लढविली नव्हती. मात्र आता राहुल जगताप पुन्हा सक्रीय झाले आहेत. राष्ट्रवादी पुन्हा म्हणत त्यांनी श्रीगोंद्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी श्रीगोंद्यातील नेत्यांना राष्ट्रवादीत आणण्याची तयारी केली आहे. ( Incoming to the NCP with Rahul Jagtap's etiquette )

श्रीगोंद्यातील दुसऱ्या फळीतील अनेक नेते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. यात वेगळ्या पक्षांतील आणि गटांतील नेत्यांचा समावेश आहे. माजी आमदार राहुल जगताप यांनी यासाठी फिल्डिंग लावल्याचे बोलले जाते. या संभाव्य राजकीय खेळीत काँग्रेस व भाजपला मानणाऱ्या नेत्यांची वाट राष्ट्रवादीच्या दिशेने दिसत आहे.

तालुक्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. त्यातच आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती या तालुका पातळीवरच्या निवडणुका होत आहेत. विधानसभेच्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार आहे. भाजप व काँग्रेसला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी नवी खेळी खेळत आहे. कार्यकर्त्यांची मानसिकता दोन्ही काँग्रेसची आघाडी व्हावी अशी असली तरी स्वबळावरच लढण्यावर राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल जगताप आग्रही आहेत. तसे झाल्यास राष्ट्रवादीला भक्कम उमेदवार लागणार असल्याने आता राष्ट्रवादीला बळकटी देण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

या खेळीचे मास्टरमाइंड राहुल जगताप असल्याचे बोलले जाते. मध्यंतरी नागवडे सहकारी कारखान्यांच्या निवडणुकीत मोठी राजकीय उलथापालथ झाली. निकाल भलाही सत्ताधाऱ्यांच्या बाजूने लागला तरीही राजकारणात तयार झालेले विरोधक कारखानदारांना अडचणीचे ठरणार आहेत. त्याचाच फायदा राहुल जगताप यांनी उचलण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. दुसऱ्या फळीतील अनेक नेते त्यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या वरिष्ठांच्या संपर्कात असून, काही दिवसांत तालुक्यात ही उलथापालथ दिसेल, असे बोलले जाते.

अनेक नेते राष्ट्रवादीत येणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली आहे. पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्नशील असून, कुणाचा पराभव करण्यासाठी नव्हे, तर आम्ही जिंकण्यासाठी ही रणनीती आखत आहोत.

- राहुल जगताप, माजी आमदार

राष्ट्रवादीत जाण्याच्या मानसिकतेत आहोत. त्यादृष्टीने तालुक्यातील अडचणी आमच्या नेत्यांच्या कानी घातल्या असून, लवकरच निर्णय करू.

- अण्णासाहेब शेलार, पंचायत समिती सदस्य, काँग्रेस

सगळ्यांना आमदारकीचे स्वप्ने पडत आहे. योग्य नेताच आमदार व्हावा हा प्रयत्न असून, आम्ही राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहोत.

- बाळासाहेब नाहाटा, संचालक, राज्य बाजार समिती महासंघ

समविचारी कार्यकर्ते याबाबत विचार करीत आहोत. चर्चा राष्ट्रवादीत जाण्याची आहे, मात्र त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

- बाळासाहेब गिरमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT