MLA Shivendraraje Bhosale
MLA Shivendraraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara : प्रवाशी, विद्यार्थ्यांची गैरसोय : शिवेंद्रसिंहराजेंनी केली एसटीच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी

Umesh Bambare-Patil

सातारा : सातारा तालुक्यातील परळी, केळवली, वावदरे आणि ठोसेघर भागातील अतिदुर्गम भागात एसटी बस नियमितपणे सुरू नाही. तेटली, बामणोली या भागातही तीच परिस्थिती असून प्रवाशांची आणि शाळा, महाविद्यालयातील मुलांची मोठी गैरसोय होत होती. यासंदर्भातील ग्रामस्थांच्या तक्रारी आल्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तडक बसस्थानक गाठले आणि विभाग नियंत्रक, डेपो मॅनेजर यांची चांगलीच कानउघाडणी केली.

सातारा तालुक्यातील परळी, केळवली, वावदरे, ठोसेघर या भागातील अतिदुर्गम अशा खेडोपाडी एसटी नियमितपणे सुरू नाही. एसटी बस सकाळी आली तर सायंकाळी येत नाही. शनिवार आणि रविवारी बस बंदच असते. अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. वयस्कर लोक, रुग्ण, शाळेतील विद्यार्थी आणि रोजंदारीसाठी कामाला जाणारा कामगार वर्ग तसेच महाविद्यालयीन युवक-युवकांची मोठी गैरसोय होत आहे.

अशा तक्रारी परळी, ठोसेघर भागातील ग्रामस्थांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंकडे केल्या. ग्रामस्थांची समस्या सोडविण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे आज (शनिवारी) सकाळी सातारा बसस्थानकातील विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात पोहचले. कार्यालयात विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्यासह डेपो मॅनेजर आणि इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी परळी, ठोसेघर भागातील दीपक देवरे, बाळू बंडू देवरे, नेताजी चिकणे, जगन्नाथ निपाणे, गणेश चव्हाण, रामचंद्र जगताप, सुनील जगताप, सुनील लोटेकर, रोहिदास जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

परळी, ठोसेघर परिसरातील रस्ते चांगले आहेत. मग, तुमची बस का जात नाही. एसटीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या समस्यांचे काहीही देणेघेणे नाही, अशी परिस्थिती असून लोकांच्या गैरसोयींकडे तुम्ही गांभीर्याने पाहत नाही. ज्यांना काम करायचे नसेल त्यांनी स्वतःहून आपली बदली दुसरीकडे करून घ्यावी. मला काम करणारी माणसं पाहिजेत. त्यामुळे कोण कुठला आहे, जिल्ह्यातला आहे का बाहेरचा आहे, याच्याशी मला देणंघेणं नाही.

तातडीने पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे बससेवा सुरु झाली पाहिजे. अन्यथा, मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, अशा कडक शब्दात शिवेंद्रसिंहराजेंनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तसेच तेटली, बामणोली या भागातही तीच परिस्थिती असून याठिकाणचीही बससेवा सुरळीत ठेवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. विभाग नियंत्रक पलंगे यांनी बससेवा त्वरित सुरळीत करतो आणि आपण स्वतः लक्ष ठेवतो, असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT