Mahavikas Aghadi-Mahayuti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Politics : कोल्हापुरातील चार मतदारसंघात बंडखोरी फिक्स; प्रस्थापितांची डोकेदुखी वाढणार

Rahul Gadkar

Kolhapur, 12 October : कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी चार विधानसभा मतदारसंघात बंडखोरीचे ग्रहण लागणार आहे. बंडखोरांचे हे ग्रहण आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील आजी माजी आमदारांचे गणित बिघडवणार आहे. करवीर, राधानगरी, कोल्हापूर उत्तर आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात बंडखोरांचा दबदबा प्रस्थापितांची डोकेदुखी ठरत आहे.

बंडखोरांना शांत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या बैठकींचे सत्र सुरू आहे. दोन मतदारसंघात बंडखोरांचे वर्चस्व असल्याने आजी-माजी आमदारांना त्याचा फटका बसू शकतो. उर्वरित दोन मतदारसंघात मतविभाजनाचा फटका प्रस्थापितांना बसणार आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीनही पक्षांनी कंबर कसली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसेनेचे उपनेते संजय पवार, माजी जिल्हाध्यक्ष विजय देवणे आणि उपमहापौर रविकिरण इंगवले यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने ही जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP Sharadchandra pawar Party) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी उमेदवारीवर दावा केला आहे. सध्या या मतदारसंघात काँग्रेसचे पारडे जड असले तरी लोकसभेतील वाटावाटीमुळे हा मतदारसंघ ठाकरेंच्या शिवसेनेला मिळावा, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे नाही आला तर शिवसैनिक बंडखोरीची भूमिका घेतील, अशी भीती निर्माण होत आहे. शिवसैनिक खासगीमध्ये तसे बोलतही आहेत. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार निश्चित नसला तरी तो निश्चित झाल्यास ठाकरे सेनेतील पदाधिकाऱ्यांच्या बंडखोरीचा फटका काँग्रेस उमेदवारीला बसू शकतो.

करवीर विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून माजी आमदार चंद्रदीप नरके हे संभाव्य उमेदवार निश्चित मानले जातात. मात्र, जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी या मतदारसंघावर दावा केल्यानंतर त्यांच्याकडून व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे संताजी घोरपडे रिंगणात उतरले आहेत. ही जागा कोणाला जाणार, यावर बंडखोरी अवलंबून आहे. मात्र घोरपडे हे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत.

मागील विधानसभा निवडणुकीत माजी आमदार चंद्रदीप नरके हे दुसऱ्या स्थानावर आहेत. दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे पुत्र राहुल पाटील यांना सहानुभूतीवर मताधिक्य मिळेल, असा अंदाज आहे. जर घोरपडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर त्याचा फटका महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांना बसण्याचा अंदाज आहे.

राधानगरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे संभाव्य उमेदवार आमदार प्रकाश आबीटकर यांचे पारडे जड आहे, तर महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीसाठी भाऊगर्दी आहेत. माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यात ठाकरे सेनेकडून उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. दोघांची उमेदवारीसाठी इर्षा सुरू असताना शिवसेनेचे निष्ठावंत प्रकाश पाटील यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे.

केपी किंवा एवाय यांना उमेदवारी मिळाल्यास प्रकाश पाटील यांची बंडखोरी होण्याची शक्यता आहे. शिवाय माजी आमदार के. पी. पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास ए. वाय. पाटील यांची बंडखोरी निश्चित आहे. त्याचा फटका महाविकास आघाडीतीलच उमेदवारांना बसण्याचा अंदाज आहे.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT