Solapur, 13 April (विठ्ठल सुतार) : शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पक्षवाढीसाठी राज्यात दौरे सुरू केले आहेत. डॉ. शिंदे यांनी आज (ता. १३ एप्रिल) धाराशिव, माढा, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. बैठकीत पदाधिकाऱ्यांमधील कुरबुरी मोठ्या प्रमाणात चव्हाट्यावर आल्या. माझे पद आठवड्याला बदलते, मी कोणत्या पदावर काम करते, हे मलाच माहिती नाही. मी सोलापूर शहरात राहतोय अन् मला जबाबदारी करमाळा, माळशिरसची दिलीय, कसं काम करायचं? अशा शब्दांत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील खदखद शिंदेंसमोर बोलून दाखवली.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांनी धाराशिव, माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. बैठकीत करमाळ्यापासून आढावा घेण्यास सुरुवात झाली. करमाळा मतदारसंघातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्याविरोधात थेट आरोप करत चुकीच्या पद्धतीने निवडी झाल्याचे सांगितले. एका पदाधिकाऱ्यांनी चिवटे यांचे नाव घेत ‘तुम्ही पद घ्या, घरी बसा, काम करू नका’ असे सांगत जिल्हाप्रमुख पदासाठी मी इच्छुक असल्याचे सांगितले.
सांगोल्याच्या (Sangola) शहरप्रमुखाने थेट शहाजीबापू पाटील यांच्यावर हल्ला चढवला. एबी फार्म माझ्याकडे दिले. मात्र, मी सांगेल त्याला एबी फार्म द्यायचा, असे शहाजीबापूंनी मला फोन करून सांगितले. त्यामुळे आमच्याकडे एबी फार्म देऊन काय उपयोग, असा सवाल केला?
माझे पद दर आठवड्याला बदलते, त्यामुळे मी कोणत्या पदावर काम करते, हे मलाच कळत नाही, अशी खंत पद्मजा इंगोले यांनी मांडली. मी सोलापूर शहराचा रहिवासी, पण मला करमाळा, माळशिरस तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मी कसं काम करायचं. मी शहरप्रमुखपदाची जबाबदारी मागतोय, पण मिळत नाही, अशी खंत नगरसेवक प्रियदर्शन साठे यांनी बोलून दाखवली.
अनेक पदाधिकाऱ्यांनी नुसते पदे वाटली आहेत, पण प्रत्यक्षात कोणच काम करीत नसल्याचे सांगितले. त्यावर माढ्याचे संजय कोकाटे यांनी रोखठोक भूमिका मांडत पक्षात उदंड पदाधिकारी झाल्याचे सांगत आता काहींना सक्तीच्या विश्रांतीची गरज असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भावना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शांतपणे ऐकून घेतल्या. अनेकांनी जिल्हाप्रमुखांसह इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडीसह कामावर आक्षेप घेतले. त्यावर शिंदे यांनी आगामी काळात तालुका आणि जिल्हा पातळीवर निवडी ह्या मुख्य पक्ष कार्यालयातूनच होईल. त्या निवडी संपर्कप्रमुखाच्या सहीनेच होणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच पदाधिकारी काम करतात का, असे विचारत पक्षांतर्गत वाद थांबवण्याची सूचना केली.
बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार व संपर्कप्रमुख धैर्यशील माने, खासदार ज्योती वाघमारे, चंद्रहार पाटील, माजी आमदार शहाजी पाटील, सिद्धाराम म्हेत्रे, भगीरथ भालके, नगरसेवक अमोल शिंदे, यांच्यासह तीनही जिल्ह्यांतील जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, युवा सेना महिला, महिला आघाडी प्रमुखांची उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.