Narendra Modi in Delhi
Narendra Modi in Delhi sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

नरेंद्र मोदींना साताऱ्यात येण्याचे निमंत्रण : जिहे कठापूरचे जलपूजन

विशाल गुंजवटे

बिजवडी : गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर योजनेचा पीएमकेएसवायमध्ये समावेश करुन २४७ कोटींचा निधी दिल्याबद्दल तसेच पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखी मार्गाचे काम मार्गी लावल्याबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गुरुवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांचे आभार मानत त्यांना जिहे कठापूर योजनेच्या जलपूजनाला येण्याचे निमंत्रण दिले.

भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे आणि माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी एक फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर योजनेच्या रखडलेल्या कामांबाबत सादरीकरण केले होते. ही योजना माण आणि खटाव तालुक्यांसाठी जलसंजीवनी ठरणार असल्याने योजनेची उर्वरित कामे त्वरित होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्रच्या प्रधानमंत्री किसान सिंचन योजनेत जिहे कठापूरचा समावेश करण्याची विनंतीही दोघांनी मोदींना केली होती. पंतप्रधानांनीही लगेच जलशक्ती मंत्रालयाला आदेश देऊन केंद्राचा निधी देण्याच्या सुचना दिल्या होत्या.

मोदींच्या आदेशानंतर त्वरित हालचाली होवून त्यांच्याच गुरुंच्या नावाने प्रगतीपथावर असणाऱ्या जिहे कठापूर योजनेचा समावेश पीएमकेएसवायमध्ये करुन २४७ कोटींचा निधीही जाहीर करण्यात आला. त्यातील सहा कोटी रुपये वर्गही करण्यात आले. कायम श्रेयवादात अडकून रखडकेल्या जिहे कठापूर योजनेची उर्वरित कामे करण्यासाठी सहाशे कोटींपेक्षा अधिक निधीची गरज आहे.

राज्याकडून इतका मोठा निधी उपलब्ध होणे शक्य नसल्याने केंद्राकडून निधी मिळविण्यासाठी आमदार गोरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती. फडणवीसांच्या कार्यकाळात या योजनेच्या पहिल्या टप्प्याची कामे मार्गी लागली होती. जिहे कठापूर योजनेसाठी केंद्राच्या जलशक्ती मंत्रालयाने निधी उपलब्ध केल्याबद्दल खासदार निंबाळकर आणि आमदार गोरे यांनी आमदार राहुल कुल, आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह मोदींची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

अमित शहा, राजनाथ सिंहांचीही भेट

पंतप्रधानांचे गुरु खटावचे लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव जिहे कठापूर योजनेला भाजपच्या कार्यकाळात देण्यात आले होते. या योजनेच्या जलपूजनाला येण्याचे निमंत्रण जिल्हाध्यक्ष आमदार गोरे आणि खासदार निंबाळकर यांनी मोदींना दिले. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील सहकारावर चर्चा केली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांचीही दोघांनी सदिच्छा भेट घेतली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT