iPhone 17 India Launch : आयफोन 17 भारतात दाखल झाला असून तो खरेदी करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांनी अॅपल स्टोअर्सबाहेर भल्यामोठ्या रांगा लावल्याचं चित्र देशभरात पाहायला मिळालं. धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स कंपनीच्या फ्लॅगशिप स्टोअरबाहेर आयफोन खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
त्यामुळे लोकांमध्ये आयफोनची क्रेझ किती आहे यांचा अंदाज लावता येऊ शकतो. तर सध्या भारतात उपलब्ध असलेल्या आयफोनची किंमत 80 हजार ते 2 लाखांपर्यंत आहे. आयफोन घेण्यासाठी लागलेल्या रांगावरून अनेक मिम्स व्हायरल होत आहेत.
अशातच आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळचे चेअरमन तथा मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद मुश्रीफ यांनी आयफोन संदर्भात केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे. त्यांनी आयफोनऐवजी दोन लाखांच्या दुभत्या गायी म्हशी घेण्याचा सल्ला तरूणाईला दिला आहे. शिवाय खरी गुंतवणूक तीच असते जी उत्पन्न देते असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नाविद मुश्रीफ यांनी आपल्या इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, 'खरं इन्व्हेस्टमेंट तेच जे उत्पन्न देतं' असं लिहिलं आहे. शिवाय त्यांनी एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये आयफोन आणि गायी म्हशींमध्ये गुंतवणूक केलेल्या पैशांची भविष्यातील स्थिती काय असू शकते हे दाखवलं आहे.
सध्या दोन लाखांना घेतलेल्या आयफोनची किंमत 2 वर्षांनंतर 40 हजार होऊ शकते. मात्र, तेच दोन लाख गायी-म्हशींमध्ये गुंतवले तर 2 वर्षांनंतर त्याचे 6 लाखांहून अधिक परतावा मिळू शकतो, असं लिहिलं आहे.
दरम्यान, नाविद मुश्रीफ यांच्या या पोस्टचे काही नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. अशी जाहिरात प्रत्येक दूध संस्थेत लावायला पाहिजे असं काही लोकांनी म्हटलं आहे. काहींनी तुमच्या म्हशी किती आहेत अशी खोचक टीकाही केली आहे.
मात्र, सध्याच्या तरूणाईसाठी मुश्रीफ यांची पोस्ट दिशा देणारी असल्याचंही काहीजण म्हणत आहेत. कारण अनेकजण परिस्थिती नसतानाही हप्त्यांवर आयफोन घेत आहेत. त्यामुळे केवळ क्रेझ म्हणून मोबाईल खरेदी न करता आपली गरज आणि वापर ओळखून तो विकत घेण्याचा सल्ला काही तज्ञांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.