Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातील गुंड सामान्य नागरिकांच्या जीवावर उठलेत तरीही राजकारणी गप्प का?

Pune law and order : पुण्याच्या रस्त्यांवर गुंडगिरीचा वाढता कहर पाहता, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालल्याचं चित्र आहे. गेल्या काही महिन्यांतील अनेक घटनांनी पुणेकरांच्या मनात प्रश्न निर्माण केला आहे. पुणे खरंच शिक्षणाचं माहेरघर आहे, की गुन्हेगारांचं आश्रयस्थान?
Pune City Crime
Pune City CrimeSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 20 Sep : पुण्याच्या रस्त्यांवर गुंडगिरीचा वाढता कहर पाहता, शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालल्याचं चित्र आहे. गेल्या काही महिन्यांतील अनेक घटनांनी पुणेकरांच्या मनात प्रश्न निर्माण केला आहे. पुणे खरंच शिक्षणाचं माहेरघर आहे, की गुन्हेगारांचं आश्रयस्थान? शहरातील गुंडांच्या टोळ्यांचा उन्माद वाढत असताना, पुण्याचे राजकारणी मात्र गप्प का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

गुंडगिरीचा वाढता वणवा

फेब्रुवारी 2024 मध्ये पुण्याचे नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारला आणि अवघ्या काही दिवसांत त्यांनी शहरातील कुख्यात गुंडांना एका रांगेत उभं करून त्यांची झाडाझडती घेतली. गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, टिपू पठाण यांसारख्या गुंडांना पोलिसांनी दम भरला.

या कारवाईचं कौतुकही झालं, व्हिडिओ व्हायरल झाले आणि पुणेकरांना वाटलं की आता कायदा सुव्यवस्था पुन्हा रुळावर येईल. पण हे चित्र फार काळ टिकलं नाही. काही दिवसांतच या गुंडांनी पुन्हा डोकं वर काढलं, आणि पोलिसांची कारवाई अपुरी पडू लागली.

गजा मारणेची दहशत

याच वर्षी फेब्रुवारीत गजा मारणेच्या टोळीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला, देवेंद्र जोग याला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केली. पण आता फार गवगवा झाला आणि खासदारांचं त्यात नाव आल्याने या प्रकरणानंतर पोलिसांनी कारवाई केली, गुन्हे दाखल झाले, काही आरोपींना अटकही झाली.

पण यातील मुख्य आरोपींपैकी एक, रुपेश मारणे, गेल्या पाच महिन्यांपासून फरार आहे. पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही आणि यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आंदेकर टोळीचा रक्तपात

सप्टेंबर महिन्यात आंदेकर टोळीने पुण्यात रक्तपात घडवला. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीच्या आदल्या दिवशी गोळ्या झाडून आयुष कोमकर या निष्पाप तरुणाचा खून केला. पोलिसांना या हत्येची पूर्वकल्पना असूनही, हा गुन्हा रोखण्यात ते अपयशी ठरले. यामुळे पुणेकरांमध्ये संताप आणि भीतीचं वातावरण आहे.

Pune City Crime
NCP Politics: साहेब, दादा, ताई एक व्हा, झाले गेले गंगेला मिळू द्या....; राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चेनं धरला पुन्हा जोर

टिपू पठाण आणि खंडणीचा धंदा

टिपू पठाणसारख्या गुंडावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, जमीन बळकावणे यासारखे तब्बल 28 गंभीर गुन्हे दाखल असूनही तो उजळ माथ्याने शहरात वावरत होता. हडपसर, कोंढवा, फुरसुंगी परिसरात त्याची दहशत कायम होती. त्याचा नोटा उधळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच पोलिसांना जाग आली आणि त्याला अटक झाली. पण तोपर्यंत त्याने सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणं सुरूच ठेवलं होतं.

निलेश घायवळ टोळीचा कहर

दोनच दिवसांपूर्वी निलेश घायवळच्या टोळीने कोथरूडमध्ये, पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर, किरकोळ वादातून एका तरुणावर गोळ्या झाडल्या आणि दुसऱ्यावर कोयत्याने हल्ला केला. या घटनेनंतर पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला अर्धा तास लागला. काही आरोपींना अटक झाली असली, तरी या प्रकरणामागे मोठा कट आहे का, याचा तपास सुरू आहे. पण या सर्व घटनांमुळे एक गोष्ट स्पष्ट आहे: गुंडांना पोलिसांचा धाक उरलेला नाही.

Pune City Crime
Shivsena controversy : आनंद दिघेंबाबतचं 'ते' वक्तव्य शिंदेंच्या शिलेदाराच्या जिव्हारी; म्हणाले, 'राऊत सर्वात मोठे गद्दार, युतीतून निवडून येऊनही ठाकरेंना...'

सर्वसामान्य पुणेकरांचं काय?

पूर्वी पुण्यातील गुन्हेगारी ही टोळ्यांपुरती मर्यादित होती, पण आता सर्वसामान्य नागरिकही या गुंडगिरीच्या जाळ्यात अडकत आहेत. कोयता गँग, वाहनांची तोडफोड, खंडणी आणि आता थेट गोळीबार आणि हल्ले यामुळे पुणेकर हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे, ज्या राजकारण्यांना नागरिक निवडून देतात, त्यांच्याकडूनही या गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. काही राजकारणी तर या गुंडांच्या व्यासपीठावर दिसले, ज्यामुळे गुंडांना राजकीय पाठबळ मिळत असल्याची शंका पुणेकरांना आहे.

पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जात होतं, पण आता गुन्हेगारांचं आश्रयस्थान बनत आहे का? पोलिसांची कारवाई अपुरी पडत आहे, राजकारणी गप्प आहेत आणि गुंडांचा उन्माद वाढत आहे. या परिस्थितीत पुणेकरांना प्रश्न पडला आहे. आमच्या शहराचं भविष्य सुरक्षित आहे का? जोपर्यंत राजकारणी आणि पोलीस यांच्यात समन्वय आणि कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत पुण्यातील ही गुन्हेगारी थांबणार नाही, हे नक्की.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com