Narayan Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Karmala Assembly Candidate : पवारांच्या राष्ट्रवादीचा करमाळा विधानसभेचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा

आण्णा काळे

Karmala, 18 July : करमाळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार ठरला असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूरच्या बैठकीत माजी आमदार नारायण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. माजी आमदार नारायण पाटील हे करमाळ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, त्यांना निवडून आणण्यासाठी आजपासूनच कामाला लागा, असा आदेश जयंत पाटील यांनी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या सोलापुरातील मेळाव्यात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याबाबतचे जाहीर विधान केले आहे. त्यामुळे नारायण पाटील (Narayan Patil) यांच्या करमाळ्यातील उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष राजकुमार पाटील, करमाळा राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष वारे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी करमाळा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी आपण इच्छुक आहे. मात्र, पक्षाने माजी आमदार नारायण पाटील यांना उमेदवारी दिली, तर त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू, असे वक्तव्य केले. त्याच वेळी जयंत पाटील यांनी नारायण पाटील यांच्याच पाठीशी आपल्या सर्वांना उभे राहायचे आहे. तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहिलात, त्याची दखल योग्य वेळी घेतली जाईल, असे सांगून वारे यांना जयंत पाटलांनी सबुरीचा सल्ला दिला.

करमाळ्यातून माजी आमदार नारायण पाटील यांना आपल्याला निवडून आणायचे आहे, त्यामुळे त्यांच्या विजयासाठी कामाला लागा, असा आदेशच जयंत पाटील यांनी करमाळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला. जयंत पाटील यांनी पक्षाच्या बैठकीतच नारायण पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केल्याने नारायण पाटील यांच्या विधानसभा उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

माजी आमदार नारायण पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तत्पूर्वी भाजपकडूनही नारायण पाटील यांना आपल्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न झाला होता. पण, नारायण पाटील यांनी राष्ट्रवादीत जाणे पसंत केले होते.

विशेष म्हणजे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पडत्या काळात पक्षात प्रवेश केला होता, त्यामुळे त्यांच्या निष्ठेची कदर करून विधानसभेची उमेदवारी जाहीर केल्याचे मानले जात आहे. माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना करमाळा विधानसभा मतदारसंघातून तब्बल 41 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. त्यात माजी आमदार नारायण पाटील यांचा वाटा मोठा असल्याचे मानले जाते.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT