शांताराम पाटील -
जयंत पाटील यांचा गेम करायचाच, या इराद्याने यावेळी भाजपने कंबर कसली होती. मात्र जयंतरावांनी विरोधकांचे सर्व मनसुबे उद्ध्वस्त करीत नगराध्यक्षपदासह 30 पैकी 22 नगरसेवक विजयी करीत विरोधकांना जोरदार धोबीपछाड दिला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करताना त्यांनी राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील, भाजपचे सम्राट महाडिक आणि शिवसेनेचे आनंदराव पवार या जिल्हाप्रमुखांसह आमदार सदाभाऊ खोत यांना त्यांनी, ‘इथे कितीही ताकद लावा मीच इथला सिकंदर,’ हे ठासून सांगितले. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांना साडेसात हजारांचे स्पष्ट मताधिक्य मिळत त्यांनी आपली मेख घट्ट केली आहे.
गत पालिका निवडणुकीतील अपयश व विधानसभेचा निसटता विजय यामुळे जयंत पाटील अस्वस्थ होते. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होताच त्यांनी, ‘मी आता पूर्णवेळ इथेच आहे,’ असे सांगतांना त्यांनी विरोधकांना ‘अभी हमारा ध्यान वक्त बदलनेपर है, रंग बदलनेवालोंको हम बाद में देखेंगे’ या शब्दात इशारा दिला दिला होता.
यावेळी त्यांचा फायनल गेम करायचा, या इराद्याने राज्य-केंद्रातील सत्तेच्या बळावर स्थानिक विरोधकांनी जोरदार कंबर कसली होती. नेहमीप्रमाणेच यावेळी जयंतविरोधी सर्व अशीच लढत झाली. मात्र विरोधकांचचा पार सुपडासाफ करीत जयंत पाटील यांनी एका विजयात अनेकांचा ‘कार्यक्रम’ केला.
जयंतरावांनी संपूर्ण प्रचारात भुयारी गटार योजनेचे लांबलेले काम, आरोग्य सेवा व स्वच्छतेचा उडालेला बोजवारा, रस्त्यांची लागलेली वाट, नक्षत्रांसारख्या बगीचांचे झालेले वाळवंट, पालिका सभागृहात सुरू असलेला एकमेकांना टोकाचा विरोध, त्यातून पडलेली विकास आघाडीतील फूट हे मुद्दे गल्लीबोळात जाऊन सांगितले. त्याला विरोधकांनी गल्लीबोळात फिरायची वेळ आल्याचे सांगत हिणवले. विरोधक तर असे म्हणत होते की, यावेळी प्रत्येक प्रभागात उमेदवार मिळतील, इथंपासून मिळाले तर ते मतदानापर्यंत टिकतील, अशी खिल्ली उडवत होते. त्याचवेळी जयंतराव विरोधकांमधील एकेक शिलेदार बाहेर काढत होते.
ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्या भाजपप्रवेशामुळे विरोधक जिंकल्याच्या आविर्भावात होते, त्यावेळी जयंतरावांनी, ‘आमच्या तिकडेही ओळखी आहेत,’ असे सांगत ‘थोडा दम काढा,’ असेच विरोधकांना सुनावले. निवडणूक जाहीर होताच त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सर्व सूत्रे स्वतःकडे घेतली. त्यांच्या खेळीचा अंदाज मांडीला मांडी लावून समर्थकांनाही ‘कार्यक्रम’ होईपर्यंत आला नाही.
उमेदवारांची चाचपणी, मुलाखती सलग 18 तास घेतल्या. पहाटेच्या 4 पर्यंत त्यांचा बैठकांचा सपाटा सुरू होता. भाजपचे निष्ठावान विजय कुंभार, महेश पाटील, एल. एन. शहा यांना त्यांनी मांडवात वाजत-गाजत आणले. त्यांना परत आणण्यासाठी निशिकांत पाटील-महाडिक यांनी केलेल्या प्रयत्नांना खूप उशीर झाला होता.
उमेदवार निवडीतील जयंतरावांचे ‘सिलेक्शन’ अचूक ठरले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवारांना प्रभागात अडकवण्यासाठी त्यांनी दिलीप पाटील यांचे चिरंजीव संग्राम पाटील यांना मैदानात उतरवले. सुभाष सूर्यवंशी, अरुणादेवी पाटील या माजी नगराध्यक्षांना त्यांनी लढाईच्या आघाडीवर आणून निवडणुकीत उतरवले. डांगे उमेदवार असणार, हे जाणून त्यांनी अण्णांचे एकेकाळचे निष्ठावान आनंदराव मलगुंडे यांनाच उमेदवारी देत धनगर मतदानातच फूट पडेल, अशी पक्की व्यवस्था केली.
विरोधकांनी विश्वनाथ डांगे यांच्या उमेदवारीसह नगरसेवकपदाचे उमेदवार ठरवण्यात विलंब केलेला पहिल्या टप्प्यात ‘बॅकफूट’वर ढकलणारा ठरला. त्यांच्याकडे सांगण्यासाठी असणारे भुयारी गटार, रस्ते, पाणी मुद्दाही केवळ आश्वासनेच होती.
इथे विरोधकांची एकी हेच प्रमुख अस्त्र होते, तेच फिके पडले. त्याचवेळी जयंत पाटील यांनी यावेळी शहरवासीयांना, ‘तुमच्या पाठिंब्यामुळे मी आहे, ’ अशी भावनिक साद घातली. ‘राज्यातील नेत्यांना माझा पराभव पाहायचा आहे, त्यांना शहर विकासासाठी काही देणेघेणे नाही, ’ असे सांगत सभेचा शेवट करीत होते.
गेल्या काही महिन्यात गोपीचंद पडळकर यांच्या जहरी टीकेमुळे तालुक्यातील कार्यकर्ते सक्रिय झाले होते. जयंत पाटलांनी इलेक्टीव्ह मेरीट पाहिले तर विरोधकांनी सिलेक्टिव्ह उमेदवारांना संधीकडे पाहिले. ईश्वरपूरचा हा विजय जयंतरावांना मोठी ऊर्जा देणारा आहे, तर विरोधकांमधील अनेक भावी आमदारांची स्वप्ने उद्ध्वस्त करणारा ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.