Congress In Nagar Parishad : पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, प्रणिती शिंदे सपशेल फेल; पश्चिम महाराष्ट्रात पतंगराव कदमांच्या लेकाने राखली काँग्रेसची लाज

western Maharashtra Political News : पश्चिम महाराष्ट्रात विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाची राजकीय ताकद कमी होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
Congress Leader
Congress LeaderSarkarnama
Published on
Updated on
  1. नगरपालिका निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी पीछेहाट झाली असून बहुतांश जिल्ह्यांत पक्षाला नगराध्यक्षपद मिळवता आले नाही.

  2. सांगली जिल्ह्यातील पलूस नगरपरिषदेत आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी विजय मिळवून काँग्रेसची मान राखली, अन्यथा स्थिती आणखी बिकट झाली असती.

  3. सोलापूर, सातारा, पुणे व कोल्हापूर या पारंपरिक बालेकिल्ल्यांत काँग्रेसची संघटनात्मक कमजोरी ठळकपणे समोर आली आहे.

Solapur, 22 December : देशाला उपपंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेतील नेते, संरक्षणमंत्री, विरोधी पक्षनेते कृषिमंत्री आणि महाराष्ट्राला सहा मुख्यमंत्री देणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची पुरती दाणादाण उडाली आहे. विधानसभेपाठोपाठ नगरपालिका निवडणुकीतही काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे. आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी पलूस नगरपरिषदेत पक्षाचा नगराध्यक्ष निवडून आणून काँग्रेसची लाज राखली आहे; अन्यथा एकेकाळी काँग्रेसची सर्व सूत्रे हाती राखणाऱ्या मातब्बरांच्या पश्चिम महाराष्ट्रात पक्षाच्या नशिबी भोपळाच निश्चित होता.

राज्यातील नगरपालिका (Nagar Palika) आणि नगरपंचायत निवडणुकीचा निकाल रविवारी (ता. २१ डिसेंबर) जाहीर झाला. त्यात महायुतीने दोनशेपेक्षा जास्त जागांवर यश मिळविले आहे. पण महायुतीच्या या झंझावतात महाविकास आघाडी पालापाचोळ्याप्रमाणे उडून गेली आहे. विशेषतः देशातील सर्वांत जुन्या असलेल्या काँग्रेस पक्षाची पुरती वाताहात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रात तर पक्षाची मोठी दुर्दशा झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. या पाच जिल्ह्यांत केवळ सांगली जिल्ह्यातील पलूस नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला (Congress) यश मिळाले आहे. त्या ठिकाणी डॉ. विश्वजित कदम यांचा करिष्मा कायम असल्याचे दिसून आले आहे. सोलापूर, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या चार जिल्ह्यांत काँग्रेसला एकही नगराध्यक्ष निवडून आणता आलेला नाही.

नगरसेवकही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच निवडून आले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून अवघे दोन नगरसेवक निवडून आले आहेत. या जिल्ह्याने एकाच वेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपद भोगले आहे. अनेक मातब्बरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्या पक्षाकडे हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच नेते आणि प्रमुख कार्यकर्ते राहिले आहेत. विशेष म्हणजे सोलापूरचे खासदारपद हे प्रणिती शिंदे यांच्या माध्यमातून काँग्रेसकडे आहे. पण त्यांच्या दुर्लक्षामुळेच पक्षाची दुरवस्था झाल्याचे सांगितले जात आहे.

पुणे जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे केवळ चार नगरसेवक निवडून आले आहेत, हा जिल्हा एकेकाळी पक्षाचा बालेकिल्ला होता. काँग्रेस पक्षाची स्थापनाच पुण्यात होणार होती. पण काही कारणांमुळे ती मुंबईत करण्यात आली होती, त्यामुळे मोठा वारसा आलेल्या पुण्यातही काँग्रेस नामशेष होताना दिसत आहे.

Congress Leader
Shiv sena UBT : उद्धव ठाकरेंनी दिलेली जबाबदारी सोलापुरातील नेत्याने नाकारली; शिवसेनेतील बेदिली पुन्हा चव्हाट्यावर

कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांच्यासारखे नेतृत्व असतानाही पक्षाला नगरपालिका निवडणुकीत यश मिळू शकलेले नाही. अवघे १४ नगरसेवक निवडून आल्याचा दावा काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे. तसेच दोन नगराध्यक्षही आमचे असल्याचे पक्षाकडून सांगितले जात आहे. मात्र, दोन्ही ठिकाणी आघाडी करून काँग्रेसने निवडणूक लढवलेली आहे. काँग्रेसच्या चिन्हावर ते निवडून आलेले नाहीत, त्यामुळे कोल्हापुरात काँग्रेसची नगराध्यक्षपदाची पाटी कोरीच राहिलेली आहे.

साताऱ्यात काँग्रेस नेतृत्वाची उज्ज्वल परंपरा आहे. (स्व.) यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करणारी मंडळी याच जिल्ह्यातून पुढे आलेली आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि विलासकाका उंडाळकर यांच्यानंतर जिल्ह्यातून काँग्रेस पक्षाचे नमोनिशाणच मिटत चालल्याचे दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकीत साताऱ्यात नगरसेवकपदाच्या केवळ चारच जागा पक्षाला जिंकता आलेल्या आहेत, विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री चव्हाण साताऱ्यात कार्यरत आहे, त्यामुळे साताऱ्यातील काँग्रेसची पडझड चिंताजनक आहे.

आमदार विश्वजित कदम यांनी मात्र पलूस नगरपरिषदेची निवडणूक जिंकून काँग्रेस पक्षाची लाज राखली आहे. पलूसच्या नगराध्यक्षपदासोबतच सांगलीत काँग्रेस पक्षाने नगरसेवक पदाच्या २३ जागा जिंकल्या आहेत. यातही एकट्या पलूसमध्ये १५, तर जतमध्ये आठ नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे कदमांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळविलेले असताना इतर नेत्यांना मात्र काँग्रेसला विजय मिळवून देण्यात अपयश आले आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर

पश्चिम महाराष्ट्राने आतापर्यंत देशाला उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री, कृषिमंत्री व इतर महत्वाच्या पदासाठी तेवढ्याच ताकदीचे नेते दिले आहेत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (स्व) यशवंतराव चव्हाण हे १९७९-१९८० च्या दरम्यान उपपंतप्रधान होते. तसेच, याच भागाने महाराष्ट्राला आतापर्यंत सहा मुख्यमंत्री दिले आहेत.

Congress Leader
Satej Patil : सतेज पाटलांची 'आमदारकीची' वाट बिकट : नगरपालिका निकालाने बदलली समीकरण : आता कोल्हापूर अन् इचलकरंजी महापालिकेकडून आशा

मुख्यमंत्र्यांमध्ये यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, बाबासाहेब भोसले (बाबासाहेब भोसले हे मुंबईच्या कुर्ला उपनगर भागातील नेहरूनगर मतदारसंघातून निवडून आले असले तरी ते मूळचे सातारा जिल्ह्यातील होते), सुशीलकुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि वसंतदादा पाटील यांनी एकपेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. नेतृत्वाची फॅक्टरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस शेवटची घटका मोजत आहे.

प्र.1: पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला कुठे यश मिळाले?
उ: केवळ सांगली जिल्ह्यातील पलूस नगरपरिषदेत काँग्रेसला नगराध्यक्षपदाचे यश मिळाले.

प्र.2: काँग्रेसला सर्वाधिक फटका कोणत्या जिल्ह्यांत बसला?
उ: सोलापूर, सातारा, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत काँग्रेसला मोठा फटका बसला.

प्र.3: पलूसमध्ये काँग्रेसच्या विजयामागे कोण होते?
उ: आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वामुळे पलूसमध्ये काँग्रेसला यश मिळाले.

प्र.4: या निकालातून काँग्रेसबाबत काय चित्र दिसते?
उ: पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा प्रभाव झपाट्याने कमी होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com