Jayant Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Jayant Patil News: माढा लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही महायुतीला धक्का देणार; जयंत पाटलांनी ताकद लावली

Deepak Kulkarni

Solapur Political News: लोकसभा निवडणुकीवेळी माढा मतदारसंघ राज्यात चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. या ठिकाणी भाजपने रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा तिकीट दिल्यामुळे नाराज झालेल्या मोहिते घराण्याने बंडाचं निशाण फडकवत शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश केला. पवारांनी हीच संधी साधत धैर्यशील मोहिते पाटलांना माढा मतदारसंघातून भाजपच्या निंबाळकरांविरोधात उमेदवारी दिली.

या हायव्होल्टेज लढतीत मोहिते पाटलांनी मोठे डाव खेळत निंबाळकरांना पराभवाचा धक्का दिला. जायंट किलर ठरलेल्या मोहिते पाटलांच्या विजयाची आठवण करुन देतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीला धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे.

टेंभूर्णी येथे बुधवारी (ता.4) झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) हे बोलत होते. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुका, पक्षबांधणी यांसह सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

लोकसभेला जसं माढा विधानसभेमध्ये मताधिक्य दिले,तसेच विधानसभेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी त्यांनी माढा लोकसभा निवडणुकीतील विजयाचं श्रेय विजयसिंह मोहिते पाटलांना दिले. त्यांच्या नेतृत्वात लाट कशी असते हे तुम्ही दाखवून दिल्याचे कौतुकोद्गार पाटील यांनी काढले.

पाटील म्हणाले, महायुती सरकारनं राज्याच्या तिजोरीचं दार उघडलं नाही तर बाजूला काढून ठेवलं.सरकार मिळेल त्या गोष्टी देत आहे.तुम्ही सरकारकडे कपडे मागितले तरी कपडे देखील काढून देतील.

तुमचा मोठेपणा आहे ते तुम्ही मागणार नाही असा चिमटाही त्यांनी शिंदे सरकारला काढला. सरकार फार मोठ्या प्रमाणात घाबरलेले आहे.निवडणूका कशा पुढे नेता येतील हे पाहात आहे असेही ते म्हणाले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणावरुन सरकारवर ताशेरे ओढले. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे हेळसांड करणाऱ्या सरकारला महाराष्ट्रात धडा शिकवायचं काम आपल्याला करायचे आहे.सरकार फार मोठ्या प्रमाणात घाबरले असल्याचा टोलाही जयंत पाटलांनी यावेळी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT