Satara Sangli MLC Election: सातारा जिल्हा परिषदेमध्ये एकत्र आलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला पाणी पाजत भाजपने सत्ता स्थापन केली होती. आता या वागणुकीचा सातारा-सांगली विधानपरिषद फायदा उचलण्याची रणनीती महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आखली जात आहे. शिवाय विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून सातारच्या दोन्ही राजेंना डावलले असा प्रचार करून त्यांच्या नाराज कार्यकर्त्यांना आपल्या बाजूने खेचण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांची खेळी आहे. संख्याबळ महायुतीच्या बाजूने असले तरी महाविकास आघाडीकडून प्रचार यंत्रणेत उपस्थित केलेले मुद्दे हे शेवटी निकालापर्यंत कितपत यशस्वी ठरतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीचे रण सध्या तापू लागले आहे. दोन्ही जिल्ह्यात महायुतीचे संख्याबळ अधिक असले तरी स्थानिक राजकारण, कुरघोड्या, शह-काटशह यामुळे दोन्ही जिल्ह्यातील राजकारण काही महिन्यांपासून चर्चेत आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना महाविकास आघाडी सोबतच आहे. तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीला दिलेल्या धक्क्याचे उट्टे काढण्याची संधी दोघांपुढे आहे.
भाजपवर असलेली मित्र पक्षांची नाराजी, स्थानिक राजकारणातून निर्माण झालेले मतभेद हे आपल्या पथ्यावर कसे पडतील? या दृष्टीने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या मतभेदाचा फायदा घेण्याचे काम जयंत पाटील करत आहेत. त्यासाठी पुन्हा सांगलीमध्ये स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित केले आहे. साताऱ्यामध्ये नाराज लोकांना गळाला लावण्याची तयारी सुरू केली आहे.
दुसरीकडे उमेदवारी निवडीच्या बाबतीत भाजपच्या नेतृत्वाने खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे यांना डावलले. त्यांचा आग्रह विचारात देखील घेतला नाही. यामुळे त्यांचा स्वाभिमान दुखावला आहे, असे म्हणत भाजपमधील दोन्ही राजेंना मानणाऱ्या गटाला चुचाकारण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी केलेला दिसतो.
ज्या ताकतीने धैर्यशील कदम विधानपरिषदेच्या रिंगणात असायला हवेत तितका जोर सध्या तरी दिसत नाही. त्याचा फायदा महाविकास आघाडीकडून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी मधील अनेक इच्छुकांसह जे पदाधिकारी नाराज आहेत त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून सुरु आहे.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणतो असे सांगितले असले तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना मदत करण्याचे आवाहन जिल्ह्यातील अनेक नेत्यांना केले होते. भाजपच्या नेत्यांना देखील सांगण्यात आले होतं. मात्र त्याकडे देखील अनेकांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे नगरसेवक मंत्री चंद्रकांत पाटलांचे म्हणणे कितपत मनावर घेतात हे देखील महत्त्वाचे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.