

Satara, 24 May : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात होणार आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणता पक्ष कोणती जागा लढविणार, हे अद्याप निश्चित झाले नाही. अनेक ठिकाणी महायुती सहज बाजी मारेल, असे वरकणी दिसत असले तरी पडद्याआड बऱ्याच घडामोडी सुरू आहेत.
सांगली-सातारा मतदारसंघात महायुती सरस दिसत असली तर योग्य प्लॅनिंगने त्यांना धक्का देता येऊ शकते, हे ओळखून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या ठिकाणी लक्ष घातले आहे. त्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बडे नेते, माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची नाव महाविकास आघाडीकडून पुढे आले आहे. त्यामुळे साताऱ्यातून शशिकांत शिंदे आणि सांगलीतून जयंत पाटील, विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील भाजपला धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीपासून महायुतीत दरी पडलेली आहे. महायुतीमधील नेते एकमेकांना भेटत असले तरी त्यांची मनं जुळलीत असं वाटत नाही, त्यामुळे प्रबळ आणि बडा नेता मैदानात उतरवून भाजपला अस्मान दाखवण्याची संधी महाविकास आघाडीला सांगली साताऱ्यात असल्याचे राजकीय जाणकर सांगातात.
या मतदारसंघात भाजपकडे ३१४ मतदार असून, त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस २०५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ११९, शिवसेना १११, काँग्रेस ७३ असे संख्याबळ आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात आघाड्या आणि अपक्षांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे महायुतीत सातारा-सांगलीची जागा ही भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती एकसंघपणे लढली नाही तर महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीकडून माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे नाव आघाडीवर आहेत. पाटील यांचे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबतही उत्तम संबंध आहेत. विशेष म्हणजे साताऱ्यात दोन्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेची युती झाली होती, त्यामुळे साताऱ्यात शिवसेनेची भूमिका निर्णायक असणार आहे. सांगलीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस वरचढ आहे, त्यामुळे साताऱ्यातील निर्णायक घडामोडी आणि सांगलीतील पाठबळाच्या जोरावर भाजपला धोबीपछाड देण्याची रणनीती महाविकास आघाडीच्या गोटात शिजत असल्याचे दिसून येत आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी याबाबत बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे, त्यानंतर बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी पुढे आली आहे. विधानसभेतील पराभवानंतर अवघ्या काही दिवसांत बाळासाहेबांनी कारखान्याची सत्ता कायम राखली होती. पुढे शिवसेनेसोबत आघाडी करत कऱ्हाड नगरपालिका निवडणुकीत विजय मिळविला आहे. बाळासाहेबांची शंभूराज देसाई यांच्यासोबत जवळीकता महत्वाची आहे, त्यामुळे महायुतीमधील बेबनाव महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या शिवसेनेसोबत आहेत. त्यांचा फलटणमधील गट हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत एकत्र होता, त्यामुळे रामराजे गटाचीही बाळासाहेबांना मदत मिळू शकते. दुसरीकडे सांगलीत जिल्हा परिषद अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आहे. सांगलीत माजी मंत्री जयंत पाटील, विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील यांनी एकत्रितपणे बाळासाहेब पाटील यांना मदत केली तर भाजपला चारीमुंड्या चित करण्याची एकमेव संधी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.