Jayant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shiva Swarajya Yatra : जयंत पाटलांनी सांगितले मोहोळमधील विजयाचे गणित; महाआघाडीच्या नेत्यांना दिला 'हा' सल्ला

विश्वभूषण लिमये

Solapur, 12 August : महाराष्ट्रातील सरकार बदलण्याची आता वेळ आली आहे. सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ही शिवस्वराज्य यात्रा सुरु केली आहे.

मोहोळला एकत्रित मिळून एक उमेदवार ठरवा, जो 100 टक्के विजयी होईल, असा उमेदवार निवडा, आपल्या मागे शरद पवार यांची ताकद आहे, असा सल्ला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोहोळमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिव स्वराज्य यात्रा (Shiva Swarajya Yatra) आज मोहोळमध्ये आली आहे, त्या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत बोलताना आमदार जयंत पाटील यांनी मोहोळमधील विजयाचे गणित सांगितले. महाराष्ट्रात आणि मोहोळमध्ये (Mohol) महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येणार आहे, असा विश्वासही जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला.

जयंत पाटील म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत आपण अभूतपूर्व यश महाविकास आघाडीला दिलं. प्रणिती शिंदे यांना मोहोळ मतदारसंघाने लीड दिल, त्याबद्दल आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने चमत्कार घडवत 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळवून दिल्या आहेत.

संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात शरद पवार यांचा प्रभाव आहे. जेंव्हा संकट आले, तेव्हा पवार साहेब सोलापुरात आले आहेत. आम्ही 5 वर्षांपूर्वीही शिवस्वराज्य यात्रा काढली होती, त्यामुळे राज्यात आपले 54 आमदार निवडून आले होते. उद्याच्या निवडणुकीत 54 पेक्षा जास्त जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस निवडून येईल, असा दावाही जयंत पाटील यांनी केला.

पाटील म्हणाले, महाविकास आघाडीने अडीच वर्षांत चांगल काम करण्याचा प्रयत्न केला आहे. पण, दोन मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपने फोडले आहेत. पवारांना सोडून गेलेल्या नेत्यासोबत राज्यातील जनता गेली नाही.

सध्या महाराष्ट्रात मोठंमोठे इव्हेंट पाहायला मिळत आहेत. सत्ताधारी लोकांच्या जाहिरातीसाठी 280 कोटी रुपये ठरवले आहेत. योजना पोहोचवण्यासाठी महिना 10 हजार प्रमाणे योजनादूत लागू केली आहे. योजना दुतांनो या सरकारची मुदत 2 महिन्यांची आहे, यांच्या नादाला लागू नका, असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

लाडकी बहीण योजनेला योग्य स्वरूप आम्ही सत्तेत आल्यानंतर देऊ, असे आमदार महेश शिंदे म्हणतात. म्हणजे विधानसभेनंतर स्पुटणी करू म्हणतात.त्यामुळे लाडक्या बहिण योजनेचे 10 लाख अर्जांचे ते दीड लाखही हे करू शकतात, असा टोला पाटील यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT