Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

जयंत पाटलांना त्या स्वागताचे अप्रूप! : पोस्ट लिहित म्हणाले...

सरकारनामा ब्यूरो

सांगली : फ्लेक्स, बॅनेरची बजबजपुरी वाढल्यामुळे अलीकडच्या काळात बोर्डावर खडूने लिहिलेल्या स्वागताची परंपरा लोप पावत आहे. मात्र, सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील गोटखिंडी शाळेतील आगळ्या वेगळ्या स्वागताने राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) भारावून गेले. त्या स्वागताने मनाला निश्चितच आनंद वाटल्याचे सांगत पाटील यांनी त्याबाबतची पोस्ट फेसबुकवर टाकली आहे. (Jayant Patil was overwhelmed by the welcome in Gotkhindi school of Valva)

त्या फेसबुक पोस्टमध्ये सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, गोटखिंडी गावच्या शाळेच्या उद्घाटनासाठी मी गेलो होतो. सार्वजनिक जीवनात जगत असताना अनेक ठिकाणी बॅनर्स लावून फोटो छापले जातात. मला जरी त्या छापील बॅनर्समध्ये फारसा रस नसला तरी सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर त्याला मान्यता द्यावी लागते. मात्र, आज जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बोर्डावर खडूने लिहिलेल्या या स्वागताने माझ्या मनाला निश्चितच आनंद वाटला. या शाळेत शिकणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी जीवनात चांगले काम करून वाळवा तालुका आणि महाराष्ट्राचे नाव जगाच्या नकाशावर कोरतील, असा विश्वास मला आहे!

दरम्यान, वाळवा तालुक्यातील दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना ॲमेझॉनच्या मदतीने जयंत दारिद्रय निर्मूलन अभियानांतर्गत पाटील यांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले. या वेळी जयत म्हणाले की आर्थिक परिस्थितीमुळे संघर्ष करणाऱ्यांना तंत्रज्ञानाची साथ देण्याचा प्रयत्न माझ्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला आहे. कोरोनाच्या काळात संपूर्ण यंत्रणाच कोलमडली, त्याला शाळाही अपवाद नाही. कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात झाली. मात्र आज अनेक दारिद्रयरेषेखालील विद्यार्थ्यांना मोबाईल, टॅब, संगणक घेणे आणि इंटरनेट सुविधा घेणे परवडत नाही. दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये, यासाठी माझ्या सहकाऱ्यांचा हा प्रयत्न आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

मागे एकदा वाळवा येथील गावांना भेटी देताना, महिला बचत गटांचे काम पाहिले होते. तालुक्यातील महिलांचे काम खूप चांगले आहे. मात्र बचत गटांच्या उत्पादनांना चांगल्या मार्केटिंगची गरज आहे. येत्या काळात हे केले जाईल व ॲमेझॉनच्या माध्यमातून मालाची विक्री करता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी या वेळी बोलताना व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT