Jayant Patil-Narsayya Adam-Mahesh kote Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur News : जयंत पाटील आडम मास्तरांना शुभेच्छा द्यायला गेले अन् महेश कोठेंसाठी फिल्डिंग लावून आले‌...

आम्ही तुम्हाला निवडून आणतो, तुम्ही येऊ नका आमच्या शहर मध्यकडे....

प्रमोद बोडके

Solapur : माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव डॉ. पृथ्वीराज माने यांच्या विवाह सोहळ्याच्या स्वागत समारंभाला शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या दौऱ्यात माजी महापौर महेश कोठे यांच्यासाठी फिल्डिंग लावून आल्याचे स्पष्टपणे दिसून आले. (Jayant Patil wished Narsayya Adam on his birthday)

माजी महापौर महेश कोठे, माजी नगरसेवक देवेंद्र कोठे, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष पाटील (Jayant Patil) यांचे राधाश्री निवासस्थानी स्वागत केले. प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्यासोबत शहर राष्ट्रवादीचे निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, प्रदेश सचिव संतोष पवार, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान उपस्थित होते.

आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने माजी महापौर कोठे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपविली आहे. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी आपल्यासोबत माजी महापौर महेश कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, माजी आमदार दीपक साळुंखे यांना घेऊन माजी आमदार नरसय्या आडम यांची सदिच्छा भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष पाटील व माजी आमदार आडम यांच्यात बराच वेळ चर्चा झाली.

माजी आमदार आडम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी माजी महापौर महेश कोठे यांच्याकडून माजी आमदार आडम यांना पुष्पगुच्छ द्यायला लावला. ‘सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात आमच्या घरकुल योजनेचे दहा हजार सभासद आहेत, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, तुम्ही येऊ नका आमच्या शहर मध्यकडे’ असे म्हणत माजी आमदार आडम यांनी मिश्‍किली सादर केली. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. आजच्या दौऱ्यातून प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी माजी महापौर कोठे यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे चित्र बघायला मिळाले.

तिकडे गेलेल्या लोकांबद्दल आम्ही जास्त बोलत नाही

महाराष्ट्र सदनात जयंतीसाठी अहिल्यादेवी होळकर व सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हटविल्याने सरकारच्या विरोधात जनता निषेध करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेले लोक फक्त सत्ता असेपर्यंत त्या ठिकाणी राहतील. सत्तेच्या माध्यमातून सवलती व निधी घेऊन परत येतील. तिकडे गेलेल्या लोकांबद्दल आम्ही जास्त बोलत नाही. एका कार्यकर्त्याने सांगितले, साहेब सहा महिने जातो आणि निधी घेऊन येतो अशी आठवणही प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी यावेळी सांगितली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT