Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Dcc Bank Result : सातारा DCC बॅंकेची निवडणूक जिंकताच जयकुमार गोरेंचा मित्रपक्षांवरच पहिला हल्ला : दगाफटका, महायुती धर्म, पाडापाडीचा केला आरोप

Jaykumar Gore Statement : सातारा जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांवर दगाफटक्याचा आरोप केला. भाजपने महायुतीचा धर्म पाळला; स्वबळावर लढल्यास विजय मिळविला असता, असे ते म्हणाले.

Vijaykumar Dudhale

Satara, 03 November : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्या पत्रकार परिषदेत भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीमधील मित्रपक्षांवर हल्लबोल केला आहे. भाजपने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म पाळला. पण, मित्रपक्षांकडून काही ठिकाणी दगाफटका केल्याचा आरोपही गोरे यांनी केला. भाजपने स्वबळावर निवडणूक लढविली असती, तर जिल्हा बँकेत विजय मिळविला असता, असे सांगत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी मित्रपक्षांच्या भूमिकेवर निशाणा साधला.

जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित संचालक अर्जुन काळे व इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आम्ही जिल्हा बॅंकेची निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचा निर्णय घेतला. जागावाटपानुसार प्रत्येक पक्षाने आपापल्या जागांवर निवडणूक लढविली. भाजपने मित्रपक्षांना प्रामाणिक साथ दिली. मात्र, फलटणमध्ये समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांचा कमी मतांनी पराभव झाला. कऱ्हाडमध्ये काहींनी महायुती धर्म पाळला, तर काहींकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, असा दावा गोरे यांनी केला.

कोरेगावमध्ये आमदार महेश शिंदे यांच्याही उमेदवाराला निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. पदवीधर निवडणुकीप्रमाणे या निवडणुकीतही मित्रपक्षांनी धोका देण्याचा प्रयत्न केला. या अनुभवातून भाजपने धडा घेतला आहे. त्यामुळे ‘मला लढायचे माहीत आहे,’ असा इशाराही गोरेंनी महायुतीमधील मित्रपक्षांना दिला.

कोरेगावमधून दोन्ही उमेदवारांमधील राष्ट्रवादीच्या उमेदवाराची शेवटची निर्णायक मतपत्रिका काहीशी फाटल्याने हे मत अवैध ठरल्याचा आरोप झाला. तसेच, सुरुवातीला निवडणूक अधिकाऱ्यांनी हे मत वैध ठरविले. नंतर काही राजकीय नेत्यांनी फोनाफोनी केल्याने ही मतपत्रिका अवैध ठरवून ईश्वरी चिठ्ठी टाकल्याचा आरोप विजयी उमेदवारांनी केला. त्यावर जयकुमार गोरे यांनी चिठ्ठी प्रकरणातील आरोपांत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.

भाजप उमेदवार अर्जुन काळेंच्या पराभवाचा डाव

भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अर्जुन काळे यांना पाडण्यासाठी महायुतीतूनच हालचाली झाल्या. मात्र, त्यांचे काम पूर्वीपासून चांगले आहे. या निवडणुकीत विरोध होऊनही एकाकी लढत देत अर्जुन काळे यांनी विजय मिळविला, असे जयकुमार गोरे यांनी सांगितले.

अध्यक्षपदाचा निर्णय वरिष्ठ घेतील

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची जबाबदारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे होती. ही बँक महायुती म्हणून आम्ही लढलो आहोत. आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार असल्याचे गोरे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT