

Solapur, 03 November : सहकार कायदा कलम ११० अ आणि ८८ च्या कारवाईनुसार सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी संचालक निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले आहेत. त्यात सात माजी आमदारांसह मातब्बर नेत्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटूनही आणि त्यानंतर सुनावणीसाठी तज्ज्ञ वकिलांची फौज उभी करूनही माजी संचालक जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतून आऊट झाले आहेत. त्यामुळे या माजी संचालकांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
माजी आमदार संजय शिंदे, प्रशांत परिचारक, रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे यांनी कलम ‘११० अ’च्या कारवाईला आव्हान देत जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ मे-२०१८ मध्ये बरखास्त झाले असले तरी आम्ही या कारवाईपूर्वीच एप्रिलमध्ये संचालकपदाचे राजीनामे दिले आहेत, त्यामुळे आमच्यावर दोन टर्म अपात्रतेची कारवाई होत नाही, असा युक्तीवाद ॲड. उमेश मराठे यांच्या वतीने करण्यात आला होता.
बँकेच्या नुकसानापोटी सहकार कायदा कलम ८८ अन्वये आमच्यावर निश्चित झालेली वसुलीची रक्कम भरण्यास आम्ही तयार आहोत; परंतु ही रक्कम भरून घेता येणार नसल्याचे लेखीपत्र बँकेने आम्हाला ३० ऑक्टोबर रोजी दिल्याचा युक्तीवाद माजी आमदार संजय शिंदे, जयवंतराव जगताप, दिलीप माने, बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे या पाच माजी संचालकांच्या वतीने करण्यात आला होता.
त्या युक्तिवादावरील निर्णय बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी सोमवारी (ता. ०३ नोव्हेंबर) राखून ठेवला होता, त्यानुसार पवार यांनी आज निर्णय देताना माजी संचालकांचे म्हणणे फेटाळून लावत त्यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरविले आहेत.
कलम ८८ आणि ११० अ च्या कारवाईनुसार माजी संचालक माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार जयवंतराव जगताप, राजन पाटील, दिलीप माने, संजय शिंदे, प्रशांत परिचारक या माजी आमदार आणि खासदारासोबतच माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे, सुरेश हसापुरे यांचे अर्ज अवैध ठरविले आहेत.
पुढची पिढी मैदानात
मातब्बरांचे अर्ज बाद झाले असले तरी त्यांच्या पुढच्या पिढीने उमेदवारी अर्ज भरले आहेत. ते अर्ज वैध ठरले आहेत. त्यानुसार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे बंधू खासदार धैर्यशील मोहिते पाटील, अर्जूनसिंह मोहिते पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप, संजयमामा शिंदे यांचे चिरंजीव यशवंत शिंदे, बबनराव आवताडेंचे चिरंजीव सुशील आणि सिद्धेश्वर आवताडे, राजन पाटील यांचे चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील आणि अजिंक्यराणा पाटील, प्रशांत परिचारक यांचे बंधू उमेश आणि पुतणे प्रणव परिचारक, दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज आणि भाचे धनंजय भोसले, सुरेश हसापुरे यांचा मुलगा श्रीदीप हसापुरे, दीपक साळुंखे यांच्या पत्नी रुपमती व मुलगा रत्नदीप, माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे, रश्मी बागल यांच्या आई श्यामराव बागल यांनी अर्ज भरले आहेत.
छाननीनंतर १६७ अर्ज शिल्लक
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी छाननीनंतर १६७ अर्ज उरलेलेराहिले आहेत. यात आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि संजीव सिद्रामप्पा पाटील (अक्कलकोट सोसायटी), आमदार राजेंद्र राऊत (बार्शी सोसायटी), शंभूराज जगताप, सुभाष गुळवे (करमाळा), अर्जूनसिंह मोहिते पाटील, सुभाष निंबाळकर (माळशिरस सोसायटी), रणजित शिंदे, यशवंत शिंदे, गणपतराव साठे, भारत शिंदे (माढा), सिद्धेश्वर आणि सुशील आवताडे (मंगळवेढा), मोहोळ विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील (बिनविरोध, मोहोळ), कल्याण काळे, उमेश परिचारक आणि प्रणव परिचारक (पंढरपूर), आमदार डॉ.बाबासाहे देशमुख, चेतनसिंह केदार-सावंत, पृथ्वीराज माने, धनंजय भोसले आणि बाबासाहेब पाटील (उत्तर सोलापूर), श्रीदिप हसापुरे, भारती राजशेखर शिवदारे (दक्षिण सोलापूर) यांचे अर्ज सोसायटी गटातून पात्र ठरले आहेत.
महिला प्रवर्गातून एकूण २७ अर्ज वैध ठरले असून त्यात माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अस्मिता गायकवाड, भाजपच्या सोलापूर शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, माजी महापौर शोभा बनशेट्टी, दीपक साळुंखेंच्या पत्नी रुपमती साळुंखे, माजी आमदार श्यामल बागल हे प्रमख महिलांच्या अर्जाचा समावेश आहे.
अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून भाजपचे माजी आमदार राम सातपुते, तर ओबीसी प्रवर्गातून अजिंक्यराणा राजन पाटील, श्रीदिप सुरेश हसापुरे, पृथ्वीराज दिलीप माने, यशवंत संजयमामा शिंदे, सिद्धेश्वर आवताडे, तर भटक्या जाती-जमातीमधून डॉ. अनिकेत देशमुख, शिवाजी कांबळे, कृषी प्रक्रिया पणनमधून खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, अर्जूनसिंह मोहिते पाटील, मिलन कल्याणशेट्टी, रणजित शिंदे, सुशील आवताडे, अजिंक्यराणा पाटील, सूर्यादित्य दीपक साळुंखे, यशवंत संजय शिंदे, दुग्ध मतदारसंघातून आमदार समाधान आवताडे, रणजित शिंदे, धैर्यशील आणि अर्जूनसिंह मोहिते पाटील, सूर्यादित्य दीपक साळुंखे यांचे अर्ज आहेत.
नागरी बॅंका, पतसंस्था गटात आमदार सुभाष देशमुख आणि त्यांचे चिरंजीव मनीष देशमुख, आमदार समाधान आवताडे, प्रणव परिचारक, सिद्धेश्वर आवताडे, कन्हैयालाल देवी, भाजपचे शहाजी पवार, शिवसेनेचे अमोल शिंदे, सिद्धाराम चाकोते, प्रकाश पाटील, कल्याण काळे या प्रमुखांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत.
राम सातपुते, रणजित शिंदेंच्या विरोधातील अपिल फेटाळले
माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांना सोसायटीत सभासद, संचालक करून घेण्यासाठी बनावट रेकॉर्ड केल्याची हरकत आणि रणजित शिंदे यांच्याकडे जगदंबा सूतगिरणीमधील देणी थकीत असल्याची हरकत घेण्यात आली होती. ती हरकत फेटाळत त्यांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.