BJP leaders Chandrakant Patil and Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

BJP News : सातारा, सोलापूरनंतर जयकुमार गोरेंचं सांगलीतील लक्ष वाढलं : पालकमंत्री चंद्रकांतदादांना साथ की ओव्हरटेकचा प्रयत्न?

BJP News : सांगलीच्या राजकारणात मंत्री जयकुमार गोरे यांची वाढती सक्रियता चर्चेत आहे. चंद्रकांत पाटील यांच्यासोबत ते भाजप मजबूत करत आहेत की स्वतंत्र राजकीय प्रभाव वाढवत आहेत, याची चर्चा सुरू आहे.

Rahul Gadkar, Hrishikesh Nalagune

- राहुल गडकर, ऋषीकेश नळगुणे

सांगली जिल्हा आणि चंद्रकांत पाटील यांचं जुनं आणि घट्ट नातं आहे. २०१४ ते २०१६ या काळात सांगलीचे पालकमंत्री असताना आणि त्यानंतर मंत्री असतानाही भाजपच्या संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी जीवतोड मेहनत घेतली. त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने निवडणूक रणनीती आखली. बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत केले. त्याचा परिणाम म्हणून २०१७ च्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत आणि २०१८ च्या सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका निवडणुकीत भाजपची पहिल्यांदाच एकहाती सत्ता आली. आताही चंद्रकांतदादा मागील दोन वर्षांपासून सांगलीचे पालकमंत्री आहेत. महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशात त्यांचा मोठा वाटा होता.

पण आता चंद्रकांत पाटील यांच्यासोबतच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही सांगली जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालायला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. मागील दोन वर्षांच्या काळातील महापालिका निवडणुकांपासून विधानपरिषदेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये आणि संघटनात्मक बदलांमध्ये गोरे यांनी लक्ष घातले होते. आता सांगली जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आणण्याची जबाबदारी आपण घेत असल्याची घोषणा गोरे यांनी केली आहे. मात्र यामुळे मंत्री गोरे हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची जिल्ह्यातील भाजप पक्ष मजबूत करण्यासाठी साथ देत आहेत की? त्यांना ओव्हरटेक करत आहेत? असा सवाल उपस्थित होत आहे.

जयकुमार गोरे हे मुळचे सातारचे आहेत. माण-खटाव मतदारसंघातून ते आमदार आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालणे सहाजिक आहे. मंत्री झाल्यानंतर गोरे सोलापुरचे पालकमंत्री झाले. त्यामुळे तिथेही पक्षाची ताकद वाढवणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण सांगलीचा आणि त्यांचा थेट संबंध नाही. तरीही ते इथल्या राजकारणात सक्रिय सहभाग घेताना दिसत आहेत. यापूर्वी पृथ्वीराज पाटील यांच्या भाजपप्रवेशामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यानंतरच्या महापालिका आणि विधानपरिषद निवडणुकीत गोरेंनी लक्ष घातलं होतं. विधानपरिषदेवेळी भाजप, राष्ट्रावादी काँग्रेस व शिवसेनेत गोरे यांनी मेळ साधल्याने भाजपचे धैर्यशील कदम विजयी झाले. आता मिरज पंचायत समिती आणि सांगली जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्याची जबाबदारी गोरे यांनी घेतली आहे.

चंद्रकांत पाटील यांच्यासारखा दिग्गज नेता इथे पालकमंत्री असतानाही गोरे यांचा सांगलीतील वावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच परवानगीने होत असणार हे नक्की. साताऱ्यातील नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर मंत्री गोरे यांच्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास वाढल्याचे सांगितले जाते. सातारा जिल्हा परिषदेतील विजयानंतर तर आरे ला कारे म्हणण्याची, प्रसंगी साम-दाम-दंड भेदाचा वापर करून सत्ता खेचून आणण्याचे कौशल्य गोरे यांच्याकडे आहे, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच गोरे यांना पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिल्याची चर्चा आहे. पण यामागे चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल सांगलीमध्ये वाढलेली नाराजी हेही कारण असल्याचे सांगितले जाते.

चंद्रकांतदादांवर नाराजी का?

भाजपचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळे महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढल्याची चर्चा आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये घटक पक्षांना मिळालेल्या वागणुकीमुळे हे दोन्ही पक्ष भाजपपासून दुरावल्याचे, तर अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील नेत्यांशी त्यांचे राजकीय संबंध अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे. सांगली महापालिकेत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपला काठावरचे बहुमत मिळाले. जिल्हा परिषदेत महायुतीकडे संख्याबळ असूनही भाजपला अध्यक्षपद मिळवता आले नाही.

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांदरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या वागणुकीमुळे भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले. त्यातूनच जिल्हा परिषद अध्यक्षपद अखेर महाविकास आघाडीच्या पारड्यात गेले आणि भाजपला मोठा राजकीय धक्का बसला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्येही भाजपची हीच घसरण कायम राहिल्याचे दिसून आले. ११ नगरपालिकांपैकी केवळ आटपाडी आणि जत या दोन ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला, तर पंचायत समित्यांमध्येही फक्त जतमध्येच भाजपला सभापतीपद मिळाले. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक सत्ताकेंद्रांवर भाजपचे वर्चस्व निर्माण करण्यात पक्षाला अपयश आल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT